दीपक मोहिते,
अमानुष घटना उघड करणाऱ्या कार्यकर्त्यांचा श्रमजीवीतर्फे स्वातंत्र्यदूत सन्मानाने गौरव,
पालघर व ठाणे जिल्ह्यांतील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना सलग दोन दिवस उजेडात आल्या आहेत. आदिम कातकरी समाजातील अल्पवयीन मुलींची लग्नाच्या नावाखाली विक्री होत असल्याचे तीन ज्वलंत धक्कादायक प्रकार श्रमजीवी संघटनेच्या सतर्क कार्यकर्त्यांमुळे उघडकीस आल्या.वाड्यातील घटना उघडकीस आणणारे मोतीराम वारे,शहापूरमधील घटनेला आळा घालणारे संजय मुकणे तर जव्हारमधील घटना कमलाकर वाघ यांच्यामुळे उघडकीस आली.त्यांना आज श्रमजीवी संघटनेच्या आयोजित विशेष कार्यक्रमात श्रमजीवी संघटनेकडून देण्यात येणारे विशेष बहुमान स्वातंत्र्यदूत या पुरस्काराने, संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित व संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
वाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत परळी परिसरातील बुधावली येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन आदिम कातकरी मुलीचे संगमनेर येथील एका तरुणासोबत जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचा प्रकार उघड झाला आहे.१४ वर्षीय तरुणीचा २०२२ मध्ये संगमनेर येथील अन्य उच्च जातीतील जीवन बाळासाहेब गाडे गावातील एका दलालाच्या मदतीने हा विवाह जुळवून देण्यात आला. दारिद्र्याचा फायदा घेऊन आई-वडिलांनी विरोध केल्यानंतरही त्यांना बदनामीची भीती दाखवून त्यांची गळचेपी करण्यात आली.गर्भवती मुलीची नोंदणी दवाखान्यात करण्यासाठी वय वाढवून बनावट आधारकार्डही करण्यात आले होते.मात्र, तिला मुलगी झाल्यामुळे सगळे गणित बिघडले.तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण होऊ लागली.तसेच, तिला उपाशी ठेवण्यात येत होते.या छळास कंटाळून अखेर ती आपल्या गावी आली व श्रमजीवी संघटनेच्या पालघर जिल्हा महिला ठिणगी प्रमुख रेखा पऱ्हाड,तालुका अध्यक्ष भरत जाधव,सचिव सुरज दळवी,मोतीराम वारे यांनी या प्रकरणी लक्ष घातल्यामुळे हा प्रकार उघडकिस आला.
अन्य एका घटनेत शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाणे हद्दीत शेणवा येथे ५० हजारांच्या मोबदल्यात एका अल्पवयीन मुलीचे प्रकाश मुकणे या दलालाने पिडीतेच्या गरिबीचा फायदा घेत पालकांना पैशाचे आमिष दाखवून पारनेर तालुक्यातील बाबुलवाडी येथील जय शिर्के तरुणाशी लग्न ठरवले.परंतु लग्नाच्या दिवशी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना घटनेची चाहूल लागताच श्रमजीवी संघटनेचे शहापूर तालुका अध्यक्ष मालू हुमणे, सचिव प्रकाश खोडका यांनी तत्काळ अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा कट उधळून लावला.
तिसरी घटना ही पालघर जिल्ह्यातील जव्हार या तालुका पोलीस हद्दीत कुतूरविहीर येथे घडली. केवळ ८५ हजारात एका महिला दलालाने १४ वर्षीय मुलीची लग्नासाठी देवाणघेवाण ठरवली.अचानक मुलीला तिच्या कुटुंबियांसोबत बोलावून घेतले.त्र्यंबकेश्वर येथील गणपती मंदिरात मोबाईलवर मंगलाष्टके लावून जळगाव मधील पाळदे येथील सचिन पाटील यासोबत लग्न लावण्यात आले.लग्नानंतर अतिश्रमाची कामे,दुसऱ्यांच्या शेतात राबवण्यात आले. तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करून आईच्या मदतीने तिचा गर्भपात घडवून आणण्यात आला.तिचा शारीरिक मानसिक छळ, मारहाण करून तिच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेऊन तिला घरातून रात्री – बेरात्री हाकलून देण्यात आले.याप्रकरणी श्रमजीवी संघटनेचे संघटक सचिव सीता घाटाळ, तालुका अध्यक्ष अजित गायकवाड, सचिव संतोष धिंडा यांनी गुन्हा दाखल केला.
वरील तिन्ही घटना अमानवी आणि बालविवाह कायद्याची पायमल्ली नसून यामध्ये माणसाचा अपव्यापार झालेला आहे.आदिम कातकरी जमात दारिद्र्य,वेठबिगारी, कर्जबाजारीपणा,सतत अन्याय अत्याचाराने दबलेली आहे. हे भयावह चित्र पाहता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी लक्ष २०४७ ची घोषणा केली आहे. त्यावेळी देशाचा मूळ पाया असलेली ही आदिम जमात २०४७ मध्ये अस्तित्वात असेल का ? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे,असे सरचिटणीस विजय जाधव म्हणाले.
कातकरी समाज हा महाराष्ट्रातील सर्वात मागासलेल्या आदिम जमातींपैकी एक असून त्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.मुंबई अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण संस्था व मुंबई विद्यापीठाच्या सर्वेक्षणानुसार राज्यात सुमारे २.९५ लाख कातकरी आहेत, त्यापैकी सर्वाधिक रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यांत वास्तव्य करतात.या समाजातील तब्बल ९१ % कुटुंबे भूमिहीन असून मजुरीवरच अवलंबून आहेत. ९७ % पेक्षा जास्त कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अवघे ₹१० हजारापेक्षा कमी आहे,तर बहुतेक कुटुंबे उदरनिर्वाहासाठी सावकारांचे कर्जबाजारी आहेत. रोजगाराच्या शोधात ६६ % कुटुंबे वर्षातून सहा ते आठ महिने स्थलांतर करतात. शासनाच्या योजना व प्रकल्प कार्यालयांपासून दूर राहिल्यामुळे या आदिम समाजाचे शैक्षणिक, आरोग्य आणि आर्थिक विकासाचे स्वप्न अद्यापही अधुरेच आहे.
नाशिक,नगर व अन्य जिल्ह्यांमध्ये ठाणे-पालघर येथील अल्पवयीन आदिवासी मुलींची लग्नासाठी विक्रीचे गंभीर प्रकार समोर येत आहेत.अशा विविध गावांमध्ये अशाच घटना घडल्याचा संशय आहे,असे श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव व जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांनी सांगितले.
अल्पवयीन कातकरी समाजातील मुलींची पैशांसाठी विक्री होत असल्याचे वास्तव या तिन्ही प्रकरणांतून समोर आले आहे.मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेश देऊन कठोर कारवाई करावी. बालविवाह प्रतिबंध कायद्याची ही केवळ पायमल्ली नसून मानवी देहाचा अपव्यापाराचा प्रकार आहे.मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून बालविकास अधिकारी व अन्य सरकारी यंत्रणेला कृतीशील करायला हवे,असे श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी सांगितले .
कातकरी जमातीतील दारिद्र्य व शिक्षणाचा अभाव यामुळे अशा अमानवी कृत्यांचा जन्म दुर्दैवाने येथे होत आहेत.१२ ते १४ वयोगटातील मुलींची सर्रास पन्नास हजारांपासून एक लाख रु.पर्यंत होणारी विक्री हा लाजिरवाणा प्रकार असून,बालविवाह प्रतिबंधक कायद्याला काळिमा फासणारा आहे.कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेची सखोल चौकशी करून कारवाईचा बडगा तातडीने उचलावा अन्यथा याविरोधात श्रमजीवी संघटना तीव्र आंदोलन करील ‘,असा इशारा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी दिला आहे.

