तलासरी प्रतिनिधी,
तलासरी येथे कविता वाचन स्पर्धेचे आयोजन,
आदिवासी प्रगती मंडळ संचालित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालय तलासरी येथे कला अकादमी व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त कविता वाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धा ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य व मराठी विभागप्रमुख डॉ. बी.ए.राजपूत हे अध्यक्षस्थानी होते.त्यांनी आपल्या प्रास्ताविकात,प्रत्येक भाषा महत्त्वाची आहे,सर्व भाषांचा सन्मान केला पाहिजे,आपली बोलीभाषा अभिमानाने बोलली पाहिजे,प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषेतून लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपली भाषा श्रेष्ठ राहावी या हेतूने प्रयत्न केले पाहिजेत.आपल्या मायबोलीवर प्रेम केले पाहिजे. आपल्या भाषेचा सन्मान वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे,असे यावेळी सांगितले. तसेच विठ्ठल वाघ यांची खापराचे दिवे आणि तिफन या दोन कविता म्हंटल्या. कवितेच्या आशयाला धरून असणारे विविध कंगोरे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मराठी विभागातील प्रा.वंदना सावे यांनी अभिजात मराठी भाषेची पार्श्वभूमी सांगून आपली माय मराठी ही स्वरचित कविता विद्यार्थ्यांपुढे सादर केली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अभिजात मराठी भाषेवरील विविध कवितांचे वाचन केले. या कार्यक्रमामध्ये दोनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

