वाडा प्रतिनिधी,
आंबिस्ते आश्रमशाळेतील दोन विद्यार्थांची गळफास घेऊन आत्महत्या,
वाडा तालुक्यातील आंबिस्ते या गावात असलेल्या कै.दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील दोन विद्यार्थांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.या आत्महत्या प्रकरणाने प्रचंड खळबळ उडाली आहे.
देविदास परशुराम नवले – १५ व मनोज सिताराम वड – १४,अशी आत्महत्या केलेल्या विद्यार्थांची नावे असून ते बिवळपाडा व दापटी ता.मोखाडा येथे राहणारे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,तालुक्यातील आंबिस्ते येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी या संस्थेची कै.दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आहे.येथे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग असून सुमारे ४५० विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. काल रात्री जेवण झाल्यावर सर्व विद्यार्थी झोपले असता मध्यरात्रीच्या सुमारास येथील सुरक्षारक्षक शाळेच्या मागच्या बाजुच्या आवारात देखरेख करत असताना झाडाला काहीतरी लटकत असताना दिसले.त्यानंतर तो झाडाच्या जवळ गेला असता दोन विद्यार्थी झाडाला गळफास घेऊन लटकत असल्याचे त्याला दिसले.त्यानंतर त्याने शाळेचे मुख्याध्यापक, अधिक्षक व इतर शिक्षकांना उठवले.त्यांनीही गावातील पोलीस पाटील व सरपंच यांना बोलावून वस्तूस्थिती दाखवली.त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले,पोलीस आल्यानंतर त्यांचे मृतदेह झाडावरून उतरवून वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र तोपर्यंत दोन्ही विद्यार्थी मयत झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.विद्यार्थांनी आत्महत्या नक्की का केली ? याचे कारण,अद्याप समजू शकलेले नाही.
घटनेची माहिती मिळताच जव्हार आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी डाॅ.अपूर्वा बासुर,पालघरचे अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले व पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी घटनास्थळाची पाहणी करून माहिती जाणुन घेतली.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पालघरचे खा.डाॅ.हेमंत सवरा व भाजपचे नेते प्रकाश निकम यांनी घटनास्थळी भेट दिली.या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान, या आत्महत्या प्रकरणाची गंभीर दखल संस्थेने घेतली असून शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय दाते व अधिक्षक राजु सावकारे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त भरत सावंत यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
या आत्महत्या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद वाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अजित साबळे करीत आहेत.
संस्थेचे या आश्रमशाळेकडे दुर्लक्ष असून या आश्रमशाळेला साधे तार कंम्पाऊंड असून तेही अनेक ठिकाणी तुटलेले आहे.त्यामुळे विद्यार्थी रात्री दहा अकरा वाजेपर्यंत बाहेर असलेल्या रस्त्यावर फिरत असतात,अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.या आत्महत्येस संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव हे जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते गोविंद पाटील यांनी केली आहे.

