वाडा प्रतिनिधी,
श्रमजीवी संघटनेतर्फे वाडा तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन,
तालुक्यातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महिलांच्या प्रश्नांवर आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला.
यावेळी ‘ कोण म्हणतो देणार नाय;घेतल्याशिवाय राहणार नाय,’अशा अनेक घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
तालुक्यातील निराधार महिलांना के.वाय.सी. करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असून त्यांना ग्रामपंचायत कार्यालयातच सरसकट योजनांचा लाभ देण्यात यावा,अंगणवाडीमध्ये गरोदर महिलांना अमृत आहार देण्यासाठी टाळाटाळ केली जात असुन या महिलांसाठी तत्काळ आहार उपलब्ध करून देण्यात यावा, तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रामध्ये परिचारिका निवासी राहणे आवश्यक आहे मात्र निवासी राहत नसल्याने रूग्णांची हेळसांड होते निवासी राहत नसलेल्या डाॅक्टर व परिचारिका यांच्यावर कारवाई करण्यात यावी,वाडा तालुक्यात जनजीवन मिशन योजना राबवली जात असुन अजूनही योजना अपूर्ण अवस्थेत असून पूर्ण झालेल्या योजनांचे पाणी लोकांपर्यंत पोहचत नसल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.संबंधित योजनांची कामे घेतलेल्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी व योजनांची कामे तत्काळ सुरू करण्यात यावीत,वाडा हा ग्रामीण तालुका असून ऑगस्ट व सप्टें. महिन्यापासून रोजगारापासून वंचित कुटूंबाना तत्काळ रोजगार हमी योजनेचे काम देण्यात यावे,अजूनही आदिवासी गाव पाडे रस्त्यांपासून वंचित असून हे रस्ते नसल्याने नागरिकांना विविध आरोग्य शिक्षणाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे,म्हणून अशा रस्ते नसलेल्या गाव पाड्यांचे रस्ते तात्काळ मंजूर करावेत, तालुक्यातील अनेक कुटूंबाच्या घरापर्यंत आजही वीज पोहचली नाही अशा सर्व वाड्या पाड्यांमध्ये विजेची व्यवस्था करून वीज पुरवण्यात यावी,यापूर्वी आदिवासी आदिम व द्रारिद्य रेषेखालील कुटुबांना सौभाग्य योजनांमधून वीज मीटर देण्यात आले होते.मात्र सदर कुटुंबे सहा ते सात महिने दरवर्षी स्थलांतरित होतात यापैकी अनेक कुटुंबाना वीज जोडण्या न देताच वीजबिल आकारण्यात आले आहे,हे वीज बिल न भरल्याचे व ही कुटुंबे स्थलांतरित असताना मीटर हे महावितरणने काढून नेले आहेत.ही वीज मीटर्स देऊन तत्काळ वीज जोडण्या देण्यात याव्यात,तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक निवासी राहत नसून प्रत्यक्ष पाहणीमध्ये अस्वच्छता आढळून आली आहे.पोषण आहार दिला जात नाही. महिला अधिक्षकांकडून मुलींना मारहाण केली जात आहे.पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नाही. सीसीटीव्ही नसल्याने आरोग्याचा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित आश्रमशाळांमध्ये संबंधितांवर कारवाई करून तत्काळ उपाययोजना होणे आवश्यक आहे,तालुक्यातील महिला सक्षमीकरणासाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी दिला असून तो निधी गेल्या दहा वर्षापासून तसाच पडून असून हा निधी महिला बचत गटांना देण्यात यावा, तालुक्यामध्ये घर बांधायला जागा नाही म्हणून ७५ गांवठाण प्रस्ताव दाखल केलेले असून सदर प्रस्ताव अजूनही वनविभागाकडे प्रलंबित आहेत,हे प्रस्ताव तत्काळ मंजूर करण्यात यावेत,शासनाच्या स्वामित्व योजने अंतर्गत घरे गांवठाण क्षेत्रात असताना त्यांची योग्य मोजमापे घेतली गेली नाहीत.त्यांची योग्य मोजमापे घेण्यात यावीत अनेक कुटुबांना घरे गांवठाण क्षेत्रात असताना वंचित ठेवले आहे त्यांना तत्काळ योजनेत घेऊन सनद वाटप करण्यात यावी, घरपट्टी नसलेल्या कुटूंबांना तत्काळ घरपट्टी देण्यात यावी या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेच्या पालघर जिल्हा महिला आघाडी प्रमुख रेखा प-हाड, तालुका उपाध्यक्ष सुजाता पारधी, सुरज दळवी यांनी केले ठिय्या आंदोलनात शेकडो श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

