जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा,
जव्हार तालुका ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे आयोजित जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन व संस्थेचा वर्धापन दिन संस्थेचे अध्यक्ष विनायक शेळके यांच्या अध्यक्षतेखाली, “नवतरुण” प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व साने गुरुजी यांच्या ‘खरा तो एकचि धर्म’ या प्रार्थनेने सुरुवात झाली. संस्थेचे दिवंगत सभासद यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. वर्धापनदिना निमित्त स्मरणिका २०२५ प्रकाशन करण्यात आले.प्रा. हर्षद मेघपुरिया सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह पाहून मला माझ्या वडिलांची आठवण झाली.ते या संस्थेचे सभासद होते व ते आनंदाने जगले.आपण सर्वांनी संस्थेच्या माध्यमातून जो एकोपा निर्माण केला आहे,तो अनुकरणीय आहे.” यावेळी त्यांनी संस्थेला रु. ५,०००/- देणगी जाहीर केली. त्यानंतर प्रमुख पाहुणे मनोज कामडी यांनी आपल्या मनोगतात “संस्थेच्या वतीने मला शाल व वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला,हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. आपल्या ज्येष्ठांचा सन्मान करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. यात ठेवण्याची घोषणा केली. यावेळी वाचनालयात होणाऱ्या जिल्हा साहित्यिक संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
या विशेष कार्यक्रमात ८६ वर्षीय “ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक” काशिनाथ दुसाने सर यांचा सत्कार करण्यात आला.तसेच ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा शाल, तुळशीचे रोप व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.संस्थेला वस्तुरूपात देणगी देणारे सुरेखा सावकारे, सुलभा अहिरे,काशिनाथ दुसाने, सुंदर पाटील, तसेच आर्थिक मदत देणारे आणि वाचनालयास पुस्तक भेट देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. वर्तमानपत्र देणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
विशेष उल्लेखनीय म्हणजे, जव्हारचा सुपुत्र ओंकार उदावंत याने ‘कोण बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमात सहभाग घेत अमिताभ बच्चन यांना जव्हारला येण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल संस्थेतर्फे त्याचा सन्मान करण्यात आला.
जव्हार नगरपरिषदेने संस्थेला कॅरम, बुद्धिबळ आणि बॅडमिंटन सेट भेट देऊन क्रीडा उपक्रमांना चालना दिली. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनीही आपले अनुभव व भावना व्यक्त केल्या.अध्यक्षीय भाषणात विनायक शेळके यांनी सांगितले की, “ ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य व आनंदी जीवन हेच आमचे उद्दिष्ट आहे. आरोग्य शिबिरे,सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला दिन, रक्षाबंधन, मकरसंक्रांत यासारख्या उपक्रमांद्वारे आम्ही सभासदांचे जीवन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. ” कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी सर्व पदाधिकारी, सभासद यांनी सहकार्य केले.

