दीपक मोहिते,
बविआचा मनपा मुख्यालयावर धडक मोर्चा,
वसई,नालासोपारा व वसई शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात काल बहुजन विकास आघाडीने नालासोपाऱ्याचे माजी आ. क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मनपा प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले.रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यामुळे लोकांचे जीव जात असून अधिकाऱ्यांना त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही,असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.
आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्च्यात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.गणेशोत्सव व नवरात्रीच्या काळात नागरिकांना या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला.या तीन शहरातील रस्त्याची अवस्था ” रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते,” अशी बिकट अवस्था झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.या प्रश्नी राजकीय पक्ष दखल घेत नसल्याचे आरोप होऊ लागल्यानंतर बहुजन विकास आघाडीने मनपा मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार आज विरार पश्चिमेस असलेल्या म्हाडा चौक येथून हा मोर्चा काढण्यात आला.यावेळी माजी आ.क्षितिज ठाकूर यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली.ते आपल्या भाषणात म्हणाले,मनपाच्या ४०० कोटी रु.च्या ठेवी कुठे गेल्या ? याचा जबाब मनपाच्या अधिकाऱ्यांनी द्यावा,आम्ही कामे करतो,नुसत्या रील बनवत नाही.मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे अधिकारी हे आमदारांना मूर्ख बनवत आहेत,असा आरोप करत त्यांनी सत्ताधारी पक्षाला आपल्या भाषणात लक्ष्य केले.यावेळी माजी आ.हितेंद्र ठाकूर यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले.

