वाडा प्रतिनिधी,
निशेत रस्त्यावर भलामोठा खड्डा पडल्यामुळे बससेवा बंद,
तालुक्यातील कळंभे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या निशेत या पाड्याकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे.मात्र या पावसाळ्यात या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडल्यामुळे या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे.त्यामुळे शाळेतील विद्यार्थांना चार ते कि.मी.चा पायी चालत जाऊन शाळा गाठावी लागत आहे. बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराविरोधात ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.
कळंभे ग्रामपंचायत हद्दीत निशेत,ठाकूर पाडा असून या पाड्यावर जाण्या येण्यासाठी बससेवा होती.येथील विद्यार्थी बसने शाळेत जात येत होते.मात्र या रस्त्यावर भलामोठा खड्डा पडल्याने बससेवा आता बंद झाली आहे.त्यामुळे येथील विद्यार्थांना कळंभे येथे शाळेत येण्यासाठी चार ते पाच किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागते.पावसापूर्वी या रस्त्याची दुरूस्ती करणे गरजेचे होते,मात्र बांधकाम विभागाने दुरूस्ती न केल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डा पडून वाहतूकच बंद झाली आहे.विद्यार्थांना जायला चार ते पाच किलोमीटर व परतीचा पुन्हा तेवढाच असा आठ ते दहा किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याने विद्यार्थी मेटाकुटीस आले आहेत.
दरम्यान,बांधकाम विभागाने रस्त्याची दुरूस्ती तत्काळ करावी,अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
रस्ता दुरूस्ती व्हावी म्हणून आमच्या ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली असून पाऊस असल्यामुळे दुरूस्ती होत नाही.पाऊस ओसरताच रस्ता दुरूस्त करण्यात येईल,असे आश्वासन बांधकाम विभागाने दिले असल्याची माहिती कळंभे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पांडुरंग पटारे यांनी दिली आहे.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम वाडा उपविभागाचे उपउभियंता संजय डोंगरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

