वसंत भोईर,वाडा
गारगाई पाणी प्रकल्पासाठी तानसा अभयारण्यातील साडेचार लाख झाडांची कत्तल,
मुंबईची तहान भागवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या वाडा तालुक्यातील गारगाई प्रकल्पाचे काम येत्या काही महिन्यात सुरु होणार आहे.या प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असुन विस्थापित होणाऱ्या एक हजाराहून अधिक कुटुंबियांनाही सद्यस्थितीत असलेल्या घरबाव जमिनीची किंमत,फळझाडे व जमिनीची किंमत किती द्यायची हे निश्चित करण्यात आले आहे.मात्र या प्रकल्पासाठी या परिसरातील जंगल व अभयारण्यातील सुमारे साडेचार लाख झाडांवर कु-हाड चालवली जाणार आहे.त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यांत जागा खरेदी करुन त्याठिकाणी तिप्पट झाडे लावण्याचे आश्वासन दिले आहे.
वाडा तालुक्याचा अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात हा प्रकल्प होत आहे.या प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिकेने सर्व्हेक्षण केले आहे.या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणारी सहा गावे व १२ पाडे यांचे पुनर्वसन करण्यासाठी वाडा तालुक्यातीच वनविभागाची जागा पाहण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या खाजगी मालकीची जमीन,झाडे व घरांच्या किंमतीचे दर बाधितांना देण्याचे आश्वासन दिले आहे.या प्रकल्पात अडसर ठरणारी साडेचार लाख झाडे तोडण्यात येणार आहेत.या झाडांच्या बदल्यात अन्य जिल्ह्यांत तीन पटीने अधिक झाडे लावण्यात येणार असल्याचे प्रयोजनही महानगर पालिकेकडून करण्यात आले आहे.या तोडण्यात येणाऱ्या झाडांची ओळख पटावी म्हणून आतापर्यंत सुमारे दोन लाख झाडांवर क्रमांकन ( छापणी ) चे काम पूर्ण झाले आहे.गेले अनेक वर्ष तानसा अभयारण्यमुळे परिसरात अनेक निर्बंध लादण्यात आले असताना त्याचा फटका स्थानिकांना बसला होता.मात्र या पाणीप्रकल्पामुळे वृक्षतोड केल्यास हे जंगल उजाड होईल,याकडे स्थानिक जनतेचे लक्ष आहे.
गारगाई प्रकल्पामुळे जवळपास एक हजार कुटुंबे विस्थापित होणार आहेत. विस्थापित होणारी सर्व कुटुंबे ही आदिवासी आहेत.या प्रकल्प क्षेत्रात येणारी खाजगी जमीन संपादनाची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. व तशा नोटीसा शेतक-यांना देण्यात आल्या आहेत.या प्रकल्पासाठी पर्यावरण विभाग, वनविभाग व स्थानिक लोकप्रतिनिधींचे एकमत झालेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
चौकट
१ ) गारगाई धरणातून होणारा पाणी पुरवठा
मुंबईला दररोज ४४० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यासाठी गारगाई प्रकल्प उभारण्यात येत आहे.या प्रकल्पामुळे वाडा तालुक्यातील ओगदा, तिळमाळ,खोडदे,फणसपाडा, पाचघर,घोडसाखरे या सहा महसूल गावांसह १० ते १२ पाड्यांचा समावेश आहे. मोखाडा तालुक्यातील आमले हे एकमेव गाव विस्थापित होणार आहे.
२ ) या प्रकल्पामुळे एकुण ११०० हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रात येणार असून यामधील ७०० हेक्टर जमीन ही तानसा अभयारण्याची असल्यामुळे या धरणाचा मोठा फटका तानसा अभयारण्याला बसणार आहे.
३) ६९ मीटर उंचीचे व ९७२ मीटर लांबीचे हे धरण बांधले जाणार आहे.या धरणाचे पाणी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मोडकसागर या धरणात बोगद्याद्वारे आणण्यात येणार आहे.या धरणासाठी मोठ्या प्रमाणात वनजमीन संपादित होणार असल्याने त्याचा परिणाम धरण परिसरातील बुडीत क्षेत्रात येणाऱ्या साडेचार लाख झाडांवर कु-हाड कोसळणार आहे.

