दीपक मोहिते,
” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
गेल्या काही दिवसापासून ” अल निनो,” ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. हे अल निनो म्हणजे नक्की काय ? त्याची जगभरात इतकी दहशत का आहे ? या दोन
प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. अल निनो हा एक स्पॅनिश शब्द असून त्याचा शब्दशः अर्थ आहे ” लहान मुलगा किंवा बाल येशू,” असा आहे.

दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि इक्वाडोर या दोन देशाच्या किनारपट्टीवर ख्रिसमसच्या दरम्यान तप्त असा सागरी प्रवाह येतो. हे पाणी जेंव्हा उष्णतेचे उच्चतम पातळी गाठते, तेंव्हा जागतिक स्तरावर हवामान बदलत असते. या अल निनो च्या प्रभावामुळे हिंद महासागरात हवेच्या दाबात प्रचंड वाढ होते व वेगाने वाहणारे मान्सूनचे वारे कमकुवत होतात. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो व देशात दुष्काळाची स्थिती निर्माण होत असते. या अल निनोच्या उलट स्थितीला ” ला नीना,” असे म्हणतात.ला नीना दरम्यान पॅसिफिक महासागराचे पाणी,समान्यपेक्षा जास्त थंड असते. जे भारतीय मान्सूनसाठी फायदेशीर असते आणि चांगला पाऊस पडतो. यंदा जागतिक हवामान संघटनेने जून ते ऑगस्ट दरम्यान अल निनो सुरू होईल, असा इशारा दिला आहे. एकदा तो सुरू झाला की साधारणपणे एक वर्ष टिकतो. त्याचा परिणाम कृषिक्षेत्रावर होतो. सुमारे १४० वर्षांपूर्वी भारतात या अल निनो मूळे २ कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. या ” अल निनो,” मुळे भारतात मान्सूनच्या पावसाच्या वितरणावर परिणाम होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तापमानाशी निगडित असलेल्या अल निनोचा परिणाम हा जगभरातील साऱ्या देशांना त्रासदायक ठरणारा आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र समितीच्या हवामान विभागाने जगातील सर्व देशांना याविषयी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

