दीपक मोहिते,
इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
इराण – अमेरिका व इराण दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या मागे अनेक कारणे आहेत. आखाती देशातील खनिज तेलाचा विपुल साठा व पॅलेस्टाईनच्या भूमीवरून मूळ निवासी असलेल्या अरबाची हकालपट्टी, अशी दोन कारणे असली तरी गेल्या काही वर्षात इराणची अणुबॉम्ब तयार करण्याच्या दिशेने सुरू झालेली वेगवान वाटचाल हे मुख्य कारण आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हट्टाला पेटले आहेत
. इराणच्या या कथित अणुबॉम्बची सर्वाधिक भिती इस्त्रायलला आहे. त्यामुळे इस्त्रायल हा गेल्या अनेक वर्षांपासून मध्यपूर्वेतील मुस्लिम राष्ट्रविरोधात अमेरिकेला सतत उसकावत असतो. अमेरिकेची अर्थव्यवस्था गेल्या काही दशकापासून ज्यू उद्योगपतींच्या लॉबीच्या हातात असून ही लॉबी अमेरिकेच्या अर्थ,व्यापार,उद्योग व रोजगार या क्षेत्राच्या निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका पार पाडत असते. त्यामुळे सत्तेत आलेल्या सरकारला या
लॉबीला डावलून कोणताही निर्णय घेता येत नाही. या ज्यूईश उद्योगपतींच्या लॉबीवर इस्रायलचा फार मोठा प्रभाव आहे. त्यामुळे अमेरिका हा अरब व ज्यू यांच्यामध्ये गेली आठ दशके सुरू असलेल्या संघर्षात कायम इस्रायलच्या पाठीशी उभा राहत आला.

१९७९ साली इराणमध्ये राजेशाही राजवट संपुष्टात आली व इस्लामिक विचारसरणी असलेले सरकार आले.कडवे धर्मगुरू अशी ओळख असलेले आयातूल्लाह खोमेनी सत्तेत आल्यामुळे इस्त्रायलचे धाबे दणाणले व त्यांनी इराणसह अन्य अरब राष्ट्रांशी दोन हात करण्यास सुरुवात केली.
आज हा संघर्ष जगाला विनाशाच्या खाईत ढकलू पाहत आहे. इराणची शस्त्रसज्जता व अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल लक्षात घेऊन अमेरिकेने इराणची विविध स्तरावर आर्थिक नाकेबंदी केली. पण इराणने या नाकेबंदीला भीक न घालता आपला अणू कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. इराणने अणुबॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे युरेनियम समृद्ध करण्याचे काम जवळपास ८४ % काम पूर्ण करत आणले आहे. येणाऱ्या काळात इराण हा ” न्यूक्लिअर पॉवर देश,” म्हणून उदयाला येऊ शकतो. त्यामुळे अमेरिका व इस्त्रायल हे दोन्ही देश सध्या इराणला नेस्तनाबूत करण्याची स्वप्ने पाहत आहेत. पण ज्या अमेरिकेने ६ व ९ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरावर अणुबॉम्ब टाकून लाखो नागरिकांना ठार मारले, अनेक पिढ्या बरबाद केल्या, तो अमेरिका आज इराणच्या सर्व शक्तीनिशी मागे का लागला आहे ? याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावे लागणार आहे.
दुसऱ्या महायुद्धात जपान शरण येत नसल्याचे पाहून अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रेडी ट्रुमन यांनी ६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्बने हल्ला करण्याचे आदेश दिले. या हल्ल्यात अवघ्या काही मिनिटात १ लाख ४० हजार जपानी नागरिक मृत्युमुखी पडले. त्यानंतर ९ ऑगस्ट १९४५ रोजी नागासाकी या शहरावर अमेरिकेने दुसरा अणुबॉम्ब टाकला.त्यामध्ये सुमारे २ लाख जपानी मारले गेले. स्फोटाच्या तीव्र उष्णतेमुळे दोन्ही शहरातील घरे व इमारती जळून खाक झाल्या. लाखो नागरिकांना कॅन्सर झाला, किरणोत्सर्गामुळे पुढील अनेक पिढ्यामध्ये जन्मजात व्यंग व शारीरिक विकृती निर्माण झाल्या. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानने शरणागती पत्करली. या घटनेच्या आठ दशकानंतरही आजही जपानी नागरिक विविध आजारांनी त्रस्त आहेत. ज्या अमेरिकेने हा नरसंहार घडवून आणला, त्या अमेरिकेला आता उपरती झाली आहे. तो आता इतर देशांनी अणुबॉम्ब बनवू नये, यासाठी दबाव आणत आहे. त्याची ही कृती इतिहासाची क्रूर चेष्टा करणारी आहे. सध्या सुरू असलेल्या या संघर्षात इराणने मात्र त्यांचा नक्षा चांगलाच उतरवला आहे.

