दीपक मोहिते,
जव्हार येथे राष्ट्रवादी काँग्रेसची तिरंगा रॅली,
राज्यातील वाढती बेरोजगारी, रखडलेली शासकीय भरती प्रक्रिया आणि युवकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यातर्फे काल जव्हार येथे ‘ बेरोजगार हक्क एल्गार,’ तिरंगा रॅली काढण्यात आली. माजी आ. सुनील भुसारा आणि पालघर जिल्हाध्यक्ष प्रीतम (सनी) एकनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीत जव्हार, विक्रमगड, मोखाडा आणि वाडा तालुक्यांतील पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गोरवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. राज्यातील रिक्त शासकीय पदांची तातडीने भरती करावी, पोलीस भरती प्रक्रिया वेगाने राबवावी, परीक्षा व भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालावा तसेच स्थानिक युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या.
भरती प्रक्रियेतील अनावश्यक विलंब दूर करून प्रत्येक जिल्ह्यासाठी रोजगारनिर्मितीचा ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणीही करण्यात आली. ‘ तरुणांच्या हाताला रोजगार द्या’, अशा घोषणांनी तिरंगा रॅलीदरम्यान परिसर दणाणून गेला.
युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांसोबतच स्थानिक विकासाच्या विविध प्रश्नांकडेही आंदोलनातून लक्ष वेधण्यात आले. स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती बंद करावी, आश्रमशाळांमधील सेंट्रल किचन पद्धत रद्द करून प्रत्येक आश्रमशाळेत स्वतंत्र स्वयंपाकगृह सुरू करावे, बोराळे-जामसर येथील १३२ केव्ही पॉवर हाऊस तातडीने सुरू करावे, तसेच सर्व ग्रामीण भागातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात.उपरोक्त मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,’ असा इशारा यावेळी देण्यात आला.
या रॅलीत सतीश आसावरे, युवा नेते दयानंद भुसारा, जव्हार तालुका कार्याध्यक्ष सोनू दादा खुताडे, महिला अध्यक्ष मनीषाताई वाणी, माजी नगराध्यक्ष रश्मीन रियाज मणियार, युवक अध्यक्ष विनोद दादा मौळे, विद्यार्थी सेल तालुकाध्यक्ष राहुल दादा घेगड, आदिवासी सेल अध्यक्ष संजय भल्ला, जिल्हा युवक कार्याध्यक्ष अधिब मुल्ला,मयूर केदार निष्ठावंत कार्यकर्ता, विद्यार्थी सेल उपाध्यक्ष रोहिदास वझरे, विद्यार्थी सेल जिल्हा सरचिटणीस अमित डोके, काशिनाथ भोये, मयूर घेगड, अंकुश घेगड, युवक उपाध्यक्ष विजय गावित, सेवा दल तालुका अध्यक्ष ईश्वर पवार, विद्यार्थी सेल अध्यक्ष सोशल मीडिया श्याम जाधव, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष विराज पाटील नगरसेवक, विक्रमगड तालुका अध्यक्ष रमेश दोडे,आदिवासी विभाग पालघर जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटकर,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

