दीपक मोहिते,
वसई-विरारच्या विविध प्रश्नासाठी माजी खा.किरीट सोमय्या यांचा धावता दौरा,
वसई-विरार शहरातील विविध नागरी, प्रशासकीय तसेच कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित प्रश्न व समस्यांचा आढावा घेण्यासाठी माजी खा. किरीट सोमय्या यांनी आज वसई-विरार परिसराचा दौरा केला.
दौऱ्यादरम्यान नालासोपारा विभागाचे सहा. पोलीस आयुक्त तसेच बोळींज पोलीस ठाण्याला भेट देऊन परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली. परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर चाप लावावा, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
त्यानंतर त्यांनी वसई-विरार शहर महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन शहरातील विविध नागरी प्रश्नांवर चर्चा केली. विशेषतः कचरा घोटाळ्याची तात्काळ चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
या भेटीनंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपा नगरसेवकांची बैठक झाली, या बैठकीत नागरिकांच्या समस्या, प्रलंबित विकासकामे तसेच विविध नागरी प्रश्नांचा आढावा घेण्यात आला.
वसई-विरारमध्ये कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासोबतच पारदर्शक प्रशासन, भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे त्यांनी माध्यमाना सांगितले.

