दीपक मोहिते,
कायमस्वरूपी पुलासाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनास प्रस्ताव सादर,
पालघर जिल्हा प्रशासनाने पालघर तालुक्यातील वाढीव व वैती या गावांसाठी कायमस्वरूपी, सुरक्षित व बारमाही दळणवळण सुविधेचा प्रस्ताव नुकताच सादर केला आहे. क्षेत्रीय पाहणी व तांत्रिक तपासणीनंतर पुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव व आराखडा पुढील मान्यतेसाठी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
वाढीव व वैती या गावांची लोकसंख्या अनुक्रमे ७७२ व ७१६ असून ही गावे चोहोबाजूंनी वैतरणा नदीने वेढली आहेत. भरती-ओहोटीच्या वेळी नदीवरील मोठ्या पुलाच्या माध्यमातूनच दळणवळण उपलब्ध करून देणे आवश्यक असलेले, एका विलग बेटवजा वस्तीचे हे वैशिष्ट्यपूर्ण प्रकरण आहे. गावात ७ वी पर्यंत शाळा असून इयत्ता ८ वी ते १२ वी चे सुमारे २५ ते ३० विद्यार्थी शिक्षणासाठी अन्य गावात जात असतात.तर अनेक रहिवासी काम व शिक्षणासाठी जवळ असलेल्या पालघर, सफाळे किंवा वसई-विरार परिसरात येजा करतात.
सद्यस्थितीत ग्रामस्थांना कांदरवणच्या बाजूने मुख्य भूमीपर्यंत पोहोचता येते. तेथे सुमारे २०० मीटर अंतरावर जेट्टीची सुविधा उपलब्ध असून सुमारे ६०० मीटरचा नदीपात्रातील प्रवास खाजगी बोटींद्वारे केला जातो. जेट्टीच्या ठिकाणी प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ११५ असून तो या गावांना पालघर व सफाळे परीसराला जोडला आहे. रेल्वे पुलावरील पादचारी मार्ग हा रेल्वेच्या देखभाल कर्मचाऱ्यांसाठी असून तो सार्वजनिक वापरासाठी निर्धारित केलेला नाही.
क्षेत्राचे विशेष स्वरूप विचारात घेऊन वाढीव-वैती दळणवळण प्रकल्प हा रस्ते काम म्हणून नव्हे, तर ‘सागरी सेतू’ काम म्हणून प्रस्तावित करण्यात आला. तांत्रिक व निधीविषयक बाबी लक्षात घेता राज्य स्तरावरील हे वर्गीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरले.
त्यानंतर जिल्हा प्रशासनाने प्रकल्पाच्या सविस्तर विचारार्थ तांत्रिक टिपणी, रेखाचित्र नकाशा, ग्रामपंचायत आराखडा, उपग्रह छायाचित्रे व इतर पूरक कागदपत्रांसह आवश्यक तांत्रिक माहिती व प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे.
प्रस्तावित पूल अंदाजे ७०० मीटर लांबीचा असून त्याचा अंदाजित खर्च सुमारे रु.२५.९५ कोटी इतका आहे. आराखडा व प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला असून आवश्यक प्रशासकीय व वित्तीय मान्यतांसाठी जिल्हा प्रशासनाकडून संबंधित प्राधिकरणांशी समन्वय व पाठपुरावा सुरू आहे.
कायमस्वरूपी पुलाचा प्रस्ताव विहित प्रशासकीय व तांत्रिक टप्प्यांतून पुढे जात असतानाच, या गावांतील रहिवाशांची ये-जा अधिक सुलभ होण्यासाठी जिल्हा प्रशासन पर्यायी दळणवळण उपायांचाही शोध घेत आहे.
गावांचे स्थान आणि वैतरणा नदीचे भरती-ओहोटीचे स्वरूप लक्षात घेता या प्रकल्पासाठी सविस्तर तांत्रिक प्रक्रिया आवश्यक आहे. कांदरवण, नवघर व वैतरणा स्थानक या बाजूंसह विविध संरेखन पर्यायांची पुलाची लांबी, संरचनात्मक व्यवहार्यता, सुगमता व खर्च या दृष्टीने तपासणी करण्यात आली. हा परिसर रेल्वे यंत्रणेच्या अखत्यारीत येत असल्यामुळे रेल्वे विभागाशी समन्वय साधणे आवश्यक ठरले. त्यामध्ये विद्यमान संरचनेचा वापर करता येईल का याचीही तपासणी करण्यात आली, जेणेकरून सार्वजनिक निधी सर्वाधिक टिकाऊ व किफायतशीर पर्यायावरच खर्च होईल.
या स्वरूपाच्या पुलासाठी पुढील तांत्रिक टप्प्यांमध्ये जलमापन व भूतांत्रिक सर्वेक्षण, भरती-ओहोटीच्या परिस्थितीस अनुरूप संरचनात्मक संकल्पन, योग्य कार्यान्वयन यंत्रणेची निश्चिती आणि भरती-ओहोटीच्या जलमार्गावर बांधकामासाठी आवश्यक वैधानिक परवानग्या प्राप्त करणे यांचा समावेश होतो. यांपैकी प्रत्येक टप्पा हा विहित तांत्रिक टप्पा असून प्रस्तावाची त्यातून सातत्याने प्रगती होत आहे.
वाढीव व वैती गावांसाठी सुरक्षित व विश्वासार्ह दळणवळण सुधारण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली या पुलाचा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या सुयोग्य, शाश्वत व वित्तीयदृष्ट्या उचित पद्धतीने पुढे नेण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. प्रस्तावित पुलामुळे या गावांतील रहिवाशांना शिक्षण, आरोग्य, रोजगार व इतर अत्यावश्यक सेवांची उपलब्धता लक्षणीयरीत्या सुधारेल, अशी अपेक्षा आहे.

