दीपक मोहिते,
वसई व नालासोपाऱ्याच्या मतदारांमध्ये प्रचंड नैराश्य,
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर वसई – विरारचे राजकारण सध्या वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. ठाकूर यांच्या ३५ वर्षाच्या राजकीय साम्राज्याला आपण सुरुंग लावू शकतो,असा आत्मविश्वास विरोधकांमध्ये बळावला असून आजच्या घडीला हे विरोधक हितेंद्र ठाकूर यांना घेरण्याची एकही संधी सोडत नाहीत. वसई- विरार शहर महानगरपालिकेच्या प्रत्येक महासभेत भाजप हा बहुजन विकास आघाडी व प्रशासकीय राजवटीतील गैरप्रकार चव्हाट्यावर आणत असल्यामुळे सत्ताधारी व प्रशासन भितीच्या सावटाखाली आले आहेत. अनधिकृत बांधकामे व आर्थिक घोटाळे, या अशा प्रकरणात हे दोघेही आकंठ बुडाले असल्याचे पावलोपावली दिसून येत आहे. दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे काही नगरसेवक दहशत व गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. त्यामुळे अनेकदा महापौर देखील अडचणीत आलेले पाहायला मिळाले. १९९० च्या दशका दरम्यान असलेली दहशत व आर्थिक ताकद, यामुळे विरोधक उघडपणे विरोध करत नसत. पण,आज परिस्थिती पार बदलली आहे. हितेंद्र ठाकूर व त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विरोधक चांगलेच सक्रिय झाले आहेत. पण एवढे महाभारत घडल्यानंतरही बहुजन विकास आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांच्या वागण्यात तसूभरही बदल झालेला नाही. आजही ही मंडळी वसईकर मतदार आपल्याला २०२९ मध्ये संधी देतील,अशा भाबड्या आशेवर जगत आहेत. पण महानगरपालिकेतील त्यांचा सध्याचा कारभार लक्षात घेता, त्यांचे हे स्वप्न ” मुंगेरीलालके हसीन सपने,” ठरण्याची शक्यता अधिक आहे. पराभवानंतर प्रत्येक राजकीय नेता आपल्या वागण्यात बदल करतो, पण येथे मात्र हे नेते आजही हवेत वावरत आहेत.
नालासोपाऱ्यातील एका नगरसेवकामुळे आघाडीची चांगलीच बदनामी होत आहे. या नगरसेवकांची अनेक प्रकरणे समाज माध्यमांवर रोजच्या रोज व्हायरल होत असतात, पण पक्षाचे वरिष्ठ नेते या प्रकरणी मूग गिळून बसले आहेत. त्यांचे हे मौन भविष्यात त्यांना त्रासदायक ठरणारे आहे.१९९० च्या दशकात वसईकर जनता फार सोशिक होती, पण ती आता तशी राहिलेली नाही. भाजपच्या रूपाने त्यांना पर्याय उपलब्ध झाला असून आज भाजपचे नेते मनोज पाटील यांनी त्यांना बऱ्यापैकी वेसण घातल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज पाटील यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्राधान्य दिल्यास ते नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून नावारूपाला येऊ शकतात. वसई विधानसभा मतदारसंघात आ.स्नेहा दुबे यांनी सध्या रिल्स बनवणे, स्थगित केले आहे.पण,त्या राज्यस्तरीय राजकारणाला प्राधान्य देऊ लागल्यामुळे २०२९ मध्ये त्यांना वसईची जनता पुन्हा संधी देतील, असे बिलकुल वाटत नाही. भाजपच्या दोन्ही आमदारांचे गेली दीड वर्षातील कारभार लक्षात घेता, भाजपला २०२९ च्या निवडणुकीसाठी अन्य पर्याय शोधावे लागणार आहेत. वसईत भाजपकडे मनोज पाटील यांच्यासारखा दमदार नेता नाही. वास्तविक स्नेहा दुबे व राजन नाईक या दोघांनी मनोज पाटील यांना साथ दिली तर पुढच्या निवडणुकीतही बहुजन विकास आघाडीला संधी मिळणे कठीण होऊ शकते. एकंदरीत ही परिस्थिती लक्षात घेता बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करणे व आपल्या वागण्यात बदल केला तरच त्यांना पुन्हा संधी मिळू शकेल. मतदारांना गृहीत धरून मनमानीपणे कारभार केल्यास पुन्हा कपाळमोक्ष हा ठरलेला आहे. वसई व नालासोपारा विधानसभा निवडणुकीत मतदारांनी “दगडापेक्षा वीट बरी,” असे मनाशी ठरवत बदल केला खरा, पण आज त्यांच्यावर कपाळाला हात लावण्याची पाळी आली आहे.

