दीपक मोहिते,
आपण,आणखी किती काळ ठराविक कुटुंबाची गुलामी करणार आहोत ?
स्वातंत्रपूर्व काळात आपण इंग्रजाची गुलामी स्विकारली होती. त्यामुळे देशातील संसाधनाची त्यांनी चांगलीच लूट केली.ईस्ट इंडिया या छोटेखानी कंपनीने दीड ते शतकापूर्वी आपल्या देशात घुसखोरी केली व हां हां म्हणता त्यांनी देश ताब्यात घेतला.
१५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश गुलामगिरीतून मुक्त झाला. गुलामगिरीचे हे जोखड भिरकावण्यासाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनात अनेक स्वातंत्र्यवीरानी आपले देह ठेवले. अनेकांची कुटुंबे त्या लढ्यात बेचीराख झाली. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या व आपण मोकळा श्वास घेऊ लागलो. या ऐतिहासिक घडामोडीनंतर आपल्याला खूप काही भोगावे लागले. इंग्रजानी त्यावेळी देशाचे भारत व पाकिस्तान असे विभाजन केल्यामुळे मोठ्याप्रमाणात नरसंहार झाला. त्याच्या आठवणी जाग्या झाल्या तरी अंगावर शहारे येतात. आपण पारतंत्र्यातून स्वतंत्र झालो, पण त्यासाठी आपल्याला फार मोठी किंमत चुकवावी लागली. गुलामीची वल्कले आपल्या अंगावरून उतरली, एका स्वतंत्र देशात आपल्याला मोकळा श्वास घेता आला.
आपल्या देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन आपण नुकताच साजरा केला. या आठ दशकाच्या वाटचालीत आपल्या देशाने विविध क्षेत्रात नेत्रदीपक अशी कामगिरी केली. उद्योग, रोजगार, कृषी, आरोग्य, शिक्षण व आर्थिक क्षेत्राचा त्यामध्ये समावेश आहे. आज आपला देश जगाच्या नकाशावर नावारूपाला आला आहे. दोन वर्षांपूर्वी आपले मानवरहित अंतराळयान चंद्रावर उतरले व आपली ओळख महासत्ता अशी झाली.
पण आठ दशकाच्या या प्रदीर्घ वाटचालीनंतरही आपण गुलामीच्या मानसिकतेमधून बाहेर पडलो आहोत का ? हा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे. ब्रिटिशांची गुलामी काळाच्या पडद्याआड गेली खरी, पण त्याजागी आपण कळत न कळत देशातील मोजक्या घराण्याची गुलामी आपण स्विकारली. ब्रिटिश गेले, त्यांची जागा सरंजामशाही व्यवस्थेला खतपाणी घालणाऱ्या कुटुंबानी घेतली. आज मोजक्या घराण्यानी देश आपल्या ताब्यात घेतला आहे. उद्योग, कृषी आरोग्य,शिक्षण व आर्थिक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. हीच मंडळी आपल्याला पुन्हा गुलामीत ढकलू पाहत आहेत. जल, जमीन व जंगल, या नैसर्गिक संसाधनावर काही ठराविक कुटुंबाची मक्तेदारी असून या तीनही नैसर्गिक संसाधनातून स्थानिक भूमीपुत्रांना सध्या हद्दपार करण्यात येत आहे. ज्यांनी त्याची वर्षानुवर्षे राखणदार म्हणून जपणूक केली,आज त्या आदिवासींना त्यांच्या हक्काच्या भूमीतून हद्दपार करण्यात येत आहे. सरकारच त्यांची पाठराखण करत असेल तर या आदिवासींना न्याय कसा व कुठून मिळणार ? या कुटुंबांनी समुद्र व्यापला,जंगले ताब्यात घेतली तर लाख मोलाच्या जमिनीचे लचके तोडले. या कुटुंबांना या गैरप्रकारात सरकारची साथ मिळालीच, पण विविध राज्यातील राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या अनेक राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांचीही चांगलीच मदत झाली. आज ही कुटुंबे सात पिढ्या घरी बसून खाऊ शकतील,इतपत धनाढ्य झाली आहेत.” श्रीमंतीचा मार्ग हा राजकारणातून जातो,” हा विचार स्वातंत्र्योत्तर काळात चांगलाच रुजला. पण,गेल्या चार महिन्यात पुन्हा स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू झाला आहे.या लढ्याची सारी सूत्रे तरुणांच्या हाती गेली आहेत. पुन्हा पारतंत्र्यात जाण्याऐवजी लढून मरणे, हाच एक पर्याय असल्याचे तरुणाईचे म्हणणे आहे. या तरुणाईने शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी जे प्रयत्न चालवले आहेत, ते नक्कीच कौतुकास्पद आहेत. कारण,या लढ्यात त्यांना परकियाशी नाही तर बिळात लपलेल्या स्वकियाशी लढावे लागणार आहे,ही महत्वाची बाब लक्षात घेऊन आपली रणनिती आखायला हवी. बाहेरच्या शत्रूपेक्षा घरातील शत्रू अधिक धोकादायक ठरत असतो.

