दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
महिलांना डावलणे ; ” देवाभाऊ,” चे ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने ” लाडकी बहीण, ” योजना कार्यान्वित करून विरोधी पक्षाचे सारे मनसूबे धुळीला मिळवले. दरमहा २ कोटी ४० लाख महिलांच्या बँक खात्यात १५०० /- रु. जमा करून महायुतीने. निवडणुकीत महाविकास आघाडीचा निवडणुकीत अक्षरशः पालापाचोळा केला. या धक्यातून विरोधक अद्याप स्वतःला सावरू शकलेले नाहीत. त्या निवडणुकीत राज्यातील समस्त महीला मतदारांनी महायुतीला डोक्यावर घेतले. महिलांचा मिळालेला उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन महायुतीने
“नारीशक्ती,” ” मातृवंदना,” ” लाडकी बहीण,” अशा गोंडस शब्दाचा वापर करत महायुती सरकार महिलांच्या सक्षमीकरण करत असल्याचा दावा करू लागले. पण ही
एकप्रकारे महिलांची फसवणूक होती. यंदा होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या १७ जागावर उमेदवार देताना भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने एकाही महिलेला उमेदवारी दिली नाही. निम्मे मतदार महिला असलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत १७ पैकी एकाही जागेवर महिलेला उमेदवारी न दिल्यामुळे महायुतीचा खरा चेहरा समोर आला आहे. संसदेत महिला आरक्षण विधेयकाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचनेचा त्यांचा डाव विरोधकांनी हाणून पाडल्यानंतर भाजप अडचणीत आला होता. त्यावेळी विरोधक हे महिला विरोधी आहेत,असा डांगोरा पिटत देशभरात त्यांनी आंदोलने केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के महिला आरक्षण लागू आहे.एकूण मतदारांपैकी निम्मा वाटा महिलांचा असताना विधानपरिषदेच्या निवडणुकीत महिलांना प्राधान्य देण्यात येईल, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसले. १७ पैकी ११ जागा लढवणाऱ्या भाजपने आणि उर्वरित जागांवर उमेदवार देणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेनेने व अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही एकाही महिलेला उमेदवारी दिली नाही. हा केवळ योगायोग मानता येणार नाही.
‘नारी शक्ती सन्मान,’ करता आला असता, ‘ लाडकी बहीण,’ योजनेपासून महिलांसाठीच्या विविध योजनांपर्यंत पक्षाने महिलांना केंद्रस्थानी ठेवणारी प्रतिमा निर्माण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘देवाभाऊ’ अशी प्रतिमा उभी करण्यात भाजप काही अंशी यशस्वी झाली. पण प्रत्यक्षात मात्र महिलांना महिलांना हे राजकीय पक्ष कसे डावलतात, हे आजवर अनेकदा अनुभवायला मिळाले. या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला ११, शिवसेना शिंदे गट – ०४ व राष्ट्रवादी काँग्रेस -०२, जागा आल्या. पण त्यापैकी एकाही महिलेला उमेदवारी देण्यात आली नाही. या सर्व घडामोडीवरून ” देवाभाऊ,” ने ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” असे सूत्र अवलंबत आपल्या लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडल्याचे स्पष्ट होत आहे.

