दीपक मोहिते,
केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
नीट पेपर फुटीवरून सध्या देशभरात वादळ उठले आहे. सरकारला शिक्षण, उद्योग, व्यापार,
कृषी व रोजगार क्षेत्रात आलेले अपयश लक्षात घेता तरुण वर्गात सरकारविरोधात प्रचंड चीड निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बेरोजगारीमुळे देशातील सुमारे २ कोटी तरुण सध्या नैराश्यात सापडले आहेत. शेतमालाला किमान हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्गही संताप व्यक्त करत आहे. दुसरीकडे शिक्षण क्षेत्राची मोठ्या प्रमाणात अवहेलना होत असल्यामुळे विद्यार्थी देखील आता आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून शिक्षण व्यवस्थेची रया पार बिघडून गेली आहे. पेपर फुटणे, हे आपल्या पाचवीला पुजले आहे.
मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. पण त्याचे हेच प्रयत्न शिक्षण क्षेत्राच्या मुळावर आले व शिक्षणाची पार वाताहत झाली. नीट पेपर फुटीने तर शिक्षण व्यवस्था कशी नसावी, हे दाखवून दिले. या गैरप्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. अनेक विद्यार्थ्यांना नैराश्य येऊन त्यांनी आत्महत्या केल्या. पण आपल्या मायबाप सरकारच्या हृदयाला पाझर फुटला नाही. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झाला. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या अभिजित दिपके या तरुणाला शिक्षण क्षेत्राची होत असलेली विटंबना पाहवली नाही व त्याने कॉक्रोच जनता पार्टी या नावाने सोशल मीडियावर एक प्लॅटफॉर्म सुरू केला. हा प्लॅटफॉर्म सुरू झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात लाखभर फॉलोव्हर्स त्याला जॉईंट झाले व त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या सर्व घडामोडीनंतर फॉलोव्हर्सची संख्या झपाट्याने वाढत कोटीच्या घरात गेली. अभिजित दिपके यांनी याविषयी आपली मते परखडपणे मांडण्यास सुरुवात केली. त्यामुळे तरुण वर्ग या चळवळीकडे आकर्षित होऊ लागला. शिक्षण क्षेत्राची सुरू असलेली वाताहत रोखायची असल्यास तरुणांनी एकवटले पाहिजे,अशा निर्णयाप्रत अभिजित दिपके आला व त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ६ जून रोजी तो भारतात परतला. त्यानंतर जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनाने विद्यार्थ्यांची ताकद दिसून आली. कोणतीही पूर्वतयारी नसतानाही तीस ते चाळीस हजार तरुण जमतात व केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागतात,असे अभूतपूर्व चित्र पाहायला मिळाले.जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाला जसा विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळाला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळाले. पण एवढे सारे रामायण घडल्यानंतरही शिक्षणमंत्री प्रधान हे राजीनामा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे १५ जून नंतर देशात फार मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे. जर का आंदोलन झाले तर मात्र परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडावे,अशी जनतेची मागणी आहे.

