दीपक मोहिते,
ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्या एका वक्तव्याने देशभरात तीव्र पडसाद,
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा आणि निवडणूक आयोगाने राबवलेली एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी, डाव्या संघट
ना आणि विरोधकांचे देशभरात सध्या जोरदार आंदोलन सुरू आहे. आंदोलन रोखण्यासाठी सरकारने दिल्लीत मोठा फौजफाटा तैनात केला आहे. यानिमित्ताने १५ ऑक्टो. रोजी दिल्ली प्रेस क्लब येथे एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये अभिजीत दिपके, नेहा बोरा, अभिनेते प्रकाश राज यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी आपापल्या भूमिका मांडल्या. या पत्रकार परिषदेमध्ये प्रशांत भूषण यांनी हे आंदोलन ” सत्ता उलथवून,” लावण्यासाठी असल्याचे म्हटले होते. प्रशांत भूषण यांच्या विधानाचे देशात सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलन,हा दिखावा असून हा सरकार उलथवून लावण्यासाठीचा प्रयत्न असल्याचा पलटवार भाजपा आणि मित्र पक्षांनी केला. त्यावर आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आपली भूमिका मांडली आहे.
अभिजीत दिपके यांनी प्रशांत भूषण यांच्या विधानापासून अंतर राखले आहे. “आम्हाला सरकार बदलायचे आहे किंवा सरकारमध्ये काही बदल करायचे आहेत, असे आम्ही म्हणत नाही. आमचे एवढेच म्हणणे आहे की, ज्या मुख्य आयुक्तांनी निवडणूक प्रक्रियेशी छेडछाड केली, दोन आयुक्तांचे मत फेटाळून लावले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना केराची टोपली दाखवली, अशा आयुक्तांना पदावरून दूर करावे. तसेच नवीन मुख्य आयुक्त पारदर्शक पद्धतीने निवडावा,” असे विधान अभिजीत दिपके यांनी केले आहे.
प्रशांत भूषण यांनी पत्रकार परिषदेत ‘रिजीम चेंज,’ असा शब्द वापरला होता. ज्यावरून भाजपाने जोरदार हल्लाबोल केल्यानंतर काही तासांतच अभिजीत दिपके यांनी हे स्पष्टीकरण दिले.
एआयएसए या विद्यार्थी संघटनेच्या नेत्या नेहा बोरा यांच्या एका जुन्या विधानावरून भाजपाने जोरदार टीका सुरू केली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारविरोधात झालेल्या जेन-झी आंदोलनावेळी नेहा बोरा यांनी या आंदोलनापासून प्रेरणा घ्यायला हवी, असे विधान केल्याचा दावा भाजपाने केला होता. भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले की, राहुल गांधी आणि त्यांच्याशी निगडित संपूर्ण इकोसिस्टिम बांगलादेशसारखी अराजकता निर्माण करून सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करत आहे.
यावर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके यांनी सीजेपीचा लढा हा केवळ निवडणूक आयोगापुरताच मर्यादित असल्याचे म्हटले. “आम्ही काय मागत आहोत ? तर निवडणूक आयोगात झालेल्या गैरकारभाराची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. लोकशाहीमध्ये अशी मागणी करणे, हे पाप किंवा गुन्हा आहे का ?,” अशी भूमिका दिपके यांनी मांडली.
सत्ता उलथवून लावण्याच्या वादावर अभिनेते प्रकाश राज म्हणाले, “ सरकार बदलणारच, पण…”
धनखड जातात, मग ज्ञानेश कुमार का नाही ?
“ केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना असे काय दिले आहे की, त्यासाठी त्यांना वाचवण्यात येत आहे. त्यांच्यासाठी दिल्ली ठप्प केली आहे. तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा देखील राजीनामा घेण्यात आला मग, ज्ञानेश कुमार यांना का संरक्षण देण्यात येत आहे,” अशी टीका अभिजीत दिपके यांनी केली.
या पत्रकार परिषदेत प्रशांत भूषण नेमके काय बोलले, यावर एक नजर टाकूया,
प्रशांत भूषण : सरकार म्हणते विरोधकांना सत्ताबद्दल हवा आहे.आम्ही निवडणुका व्यवस्थित व्हाव्यात, यासाठी लढत आहोत.पण जर अशीच जुलूमशाही चालू राहिली तर नक्कीच सत्ताबदल होईल.आम्हा सगळ्यांनाच सत्ताबदल हवा आहे.यामध्ये चुकीचे असे काय आहे ? भाजपने देखील सत्ताबदल करण्यासाठी यापूर्वी अनेक आंदोलने केली होती.सरकारविरुद्ध असंतोष पसरवणे, हा गुन्हा नाही,प्रत्येक नागरिकाचा तो अधिकार आहे.
त्यावर पलटवार करताना संरक्षणमंत्री राजनाथसिंग काय म्हणाले तेही आपण पाहूया,
राजनाथसिंग : आता त्यांचा अजेंडा स्पष्ट झाला आहे.ते तरुणांना अराजकतेच्या राजकारणात प्यादे बनवत आहेत.बांगला देशात जे घडले, तसे त्यांना भारतात सत्ताबदल घडवायचे आहे.
नेहा बोरा काय म्हणाल्या होत्या,
नेहा बोरा : बांगला देशच्या झेन – जी च्या आंदोलनाने आम्हाला मार्ग दाखवला.आम्ही तुम्हाला लाल सलाम करतो. बांगला देशात लोकशाही आणि मताधिकारासाठी लढा झाला, तसाच लढा आम्ही भारतात करतोय.
प्रशांत भूषण व नेहा बोरा या दोघांच्या वक्तव्याचे भांडवल करून भाजप व त्यांचे मित्रपक्ष देशभर रान उठवतील, याची कल्पना असल्यामुळे अभिजित दीपके यांनी माध्यमासमोर येऊन खुलासा केला आहे.

