दिपक मोहिते,
” स्पॉटलाईट,”
आर्थिक व धार्मिक अराजक निर्माण होणे,म्हणजे राज्याच्या विकासाची गती खुंटणे,
गेल्या काही दिवसांपासून राज्यात जे काही घडत आहे, ते केवळ निंदनीय नाहीच तर लांच्छनास्पद असेच आहे.सुसंस्कृत व पुरोगामी महाराष्ट्र,अशी ओळख असलेल्या राज्यात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत.समाज विस्कळीत करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत,पण सरकार कारवाई करण्याऐवजी उघड्या डोळ्याने पाहत आहे. पैश्याची जी उधळपट्टी होत आहे, त्यामुळे आपले राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहे.यामागे कोणत्या शक्ती आहेत,यावर कठोर उपाययोजना न झाल्यास राज्याचे काही खरं नाही.ही स्थिती कायम राहिल्यास त्याचे दूरगामी परिणाम होतील व राज्यातील उद्योगधंद्याचे इतर राज्यात पलायन सुरू होईल.त्यामुळे सरकारने वेळीच कठोर पावले उचलायला हवीत.अन्यथा नव्या पिढीचे भवितव्य अंधारात सापडेल, ती वेळ येऊ नये,यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेऊन राज्यात धार्मिक सलोखा व शांतता राहील,यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत.
सत्तेच्या हाराकिरीतुन दंगलीच्या घटना घडत असल्याचा सर्वत्र संशय व्यक्त होत आहे. यामध्ये तथ्य असेल तर आपल्या निकोप समाजव्यवस्थेला ते हानिकारक आहे.गेल्या काही वर्षात राज्याच्या अनेक जिल्ह्यात नेत्यांच्या असंबंध वक्तव्यानी धार्मिक सलोखा बिघडवण्याचे काम केले. पण त्यावर कारवाई करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले नाहीत.धार्मिक सलोखा व शांततेचे वातावरण बिघडवणारे कोण आहेत,याचा शोध लागला पाहिजे.
समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल,अशा आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडियावर टाकणे,नको त्या व्यक्तीचे स्टेटस ठेवणे व ते व्हायरल करणे,हे जे प्रकार सुरू आहेत,ते रोखण्यासाठी सायबर शाखेने कारवाईचा बडगा उचलावा.अशा घटनामधून होणाऱ्या दंगलीमुळे राज्याच्या विकासावर परिणाम होऊन गोरगरीब जनतेला त्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत.सत्तेचा मार्ग हा धार्मिक उन्मादातून सापडतो,अशा विचाराचे अधिष्ठान असलेले मूठभर राजकीय पक्ष सध्या जी काही कटकारस्थाने करत आहेत.ती आपल्या समाजव्यवस्थेच्या मुळावर येणारी आहेत.बाबरी मशीद पतनानंतर ज्या दंगली उसळल्या,त्यामध्ये अनेक नागरिकांच्या संसाराची राखरांगोळी झाली.आजही त्या जखमांच्या खुणा पुसल्या गेल्या नाहीत.पस्तीस वर्षानंतर पुन्हा आपण त्याच वळणावर येवून पोहोचलो आहोत.सोशल मिडियाच्या माध्यमातून ज्ञानाचे भांडार उपलब्ध होते, असा जो समज होता तो नुकत्याच घडलेल्या घटनांनी फोल ठरला आहे.
राजकारणाची पातळी ही दिवसेंदिवस खालावत चालली आहे.राजकीय स्वार्थापोटी नेतेमंडळी या संवेदनशील विषयाचा बेमालूमपणे वापर करू लागले आहेत.धर्मसंस्था व शासनसंस्था,अशी जेंव्हा गल्लत होते,तेंव्हा त्या राज्यात किंवा देशात अराजक निर्माण होत असते.अराजकाची स्थिती निर्माण होणे,म्हणजे विकासाची गती खुंटणे होय.औरंगाबाद,नाशिक,
पुणे,ही शहरे उद्योगनगरी म्हणून ओळखली जातात,अशा या शहरात जर दूषित वातावरण निर्माण होत असेल तर उद्योगधंदे इतर राज्यात का जाणार नाहीत.कारण उद्योगवाढीसाठी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चांगली असावी लागते,पायाभूत सोयी-सुविधा योग्य प्रमाणात असाव्या लागतात.तरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.त्यामुळे राज्य अस्थिर राहणे,हे कोणाच्याच हिताचे नाही,त्याची जाणीव राज्यकर्त्यांनी ठेवायला हवी.
६ डिसें.१९९२ रोजी बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबई व देशाच्या अनेक प्रांतात हिंसक दंगली झाल्या.त्यामध्ये ९०० जण मृत्युमुखी पडले.हे सर्व नागरिक सर्वसामान्य घटकातील होते.हजारो कोटी रु.च्या मालमत्तेचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले.त्यानंतर मुंबई शहरात बॉम्बस्फोट झाले,त्यामध्ये २५७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला.धार्मिक तेढ,धर्मांधता व जातीभेद या कारणामुळे आपण १९५० साली स्विकारलेल्या संविधानातील धर्मनिरपेक्षता या संकल्पनेला आता तडा जाऊ लागला आहे.गेल्या २०० वर्षाचा जगाचा इतिहास पडताळून पाहिल्यास ज्या ज्या देशाच्या राजकारणात धर्मसंस्थेने शिरकाव केला,ते सिरिया,इराक,इराण,
अफगाणिस्तान,
पाकिस्तान,बांगला देश,म्यानमार या देशाची वाताहत झाली.हा इतिहास सांगण्यामागे एकच उद्देश आहे,तो म्हणजे या इतिहासापासून आपण काही शिकणार आहोत कि नाही ? सत्तेचे राजकारण नक्की करा,पण समाज व्यवस्था अबाधित ठेवून करा.आज जे काही चालले आहे,ते आपल्या नावलौकीकाला साजेसे नाही.हिंसक दंगली आपल्या देशाला व राज्याला परवडणाऱ्या नाहीत.सत्तेच्या या संघर्षांत एकमेकांची उणी दुणी काढा,पण त्याला धार्मिक व जातीयवादाची फोडणी देऊ नका.
आज राज्यासमोर विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.कांदा उत्पादक शेतकरी जीवानिशी जाताहेत,महागाईने प्रचंड उसळी घेतली आहे,ग्रामीण भाग पाणीटंचाईमध्ये होरपळत आहे,आरोग्य व वैद्यकीय सेवा पार लयाला गेल्या आहेत,बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे व शिक्षण व्यवस्था अद्याप रुळावर आलेली नाही.या क्षेत्रात प्रचंड सावळागोंधळ आहे. राज्याच्या डोक्यावर आजच्या घडीला १० लाख कोटीचे कर्ज आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्या करत आहे.अशावेळी राज्य अधिक अस्थिर होणे,आपल्याला परवडणारे नाही.सत्तेचा मार्ग हा लोकशाही प्रक्रियेतून मिळवता आला पाहिजे.त्यासाठी सर्वप्रथम कायदा-सुव्यवस्था व निकोप समाजव्यवस्था अबाधित राखणे व राज्य आर्थिकदृष्ट्या संपन्न राहणे महत्वाचे आहे.पण कर्जावरील व्याज देण्यासाठी पुन्हा कर्ज घेणे, म्हणजे आपल्या राज्याची वाटचाल विनाशाच्या दिशेने सुरु झालीआहे. सध्या राजकीय आघाडीवर जे काही चालले आहे,त्यामध्ये कोणाचेही भले होणार नाही.राजकारणाची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मुतणे,थुंकणे,
शिवीगाळ करणे,ही आपली संस्कृती नाही.
राज्य पहिल्या क्रमांकावर कायम टिकून राहण्यासाठी सत्ताधारी व विरोधक या दोघांनी सामंजस्याची भूमिका स्विकारली पाहिजे.परकीय गुंतवणुकीसाठी राज्यात सौहार्द व औद्योगिक शांतता असायला हवी,व ती जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे,तरच राज्य खऱ्या अर्थाने गतिमान व वेगवान होऊ शकेल.केवळ जाहिराती व प्रसिद्धी यावर अवलंबून राहून राज्य प्रगतिशील होऊ शकत नाही.चांगले वातावरण निर्मितीसाठी दंगली व जातीय तेढ वाढणे,टाळायला हव्यात.
सत्तेचा स्वार्थ,हा योग्य मार्गाने साधला गेला पाहिजे,सामाजिक सुरक्षितता अबाधित राहील,यास सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे.गेल्या ८० वर्षांत अनेक दंगली घडल्या,पण त्यातून काहीच साध्य झाले नाही.फाळणीच्या वेळी जे घडलं,त्याच्या जखमा आता भरल्या आहेत.त्यावरची खपली काढण्याचा होत असलेला प्रयत्न थांबला पाहिजे. तरच आपला महाराष्ट्र व देश अधिक सुजलाम सुफलाम होऊ शकतो.

