दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
येत्या दसरा मेळाव्यात राज व उद्धव एकाच मंचावर,
यंदाचा शिवसेना ( उबाठा गटाचा हिरक महोत्सवी ( ६० वा ) दसरा मेळावा मंगळ. २० ऑक्टो. रोजी सांयकाळी ५.०० वाजता शिवाजी पार्क,दादर येथे होणार आहे. दुसरीकडे त्याच सुमारास शिवसेनेचा ( शिंदे गट ) यांचा दसरा मेळावा नेस्को संकुल गोरेगाव येथे होत आहे.त्यांच्या या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षातर्फे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार सायकली, २५ हजार शिलाई मशिन्स व आनंदाचा शिधा वाटप करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षांपासून उद्धव व राज हे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. यंदा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने हे दोघे एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. हा गेल्या ६० वर्षातील सर्वात मोठा राजकीय इव्हेन्ट ठरू शकतो. १९ जून १९६६ रोजी सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन केली, तेंव्हा लोकांनी ही संघटना ६ महिन्यापेक्षा अधिक काळ टिकणार नाही, अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या.
१९६६ ते १९८५ या १९ वर्षात बाळासाहेबांच्या या संघटनेने ” मराठी माणूस ते हिंदुत्व,” अशी यशस्वी वाटचाल केली. मुंबई व लगत असलेल्या ठाण्यात त्यांनी मराठी अस्मितेचा नारा देत आपल्या संघटनेची दिशा हिंदुत्वाकडे वळवली. हे करत असताना बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून शिवाजी पार्क व शिवसेना असे समीकरण तयार झाले. त्यानंतरच्या काळात शिवसेनेने मनोहर जोशी, नारायण राणे व उद्धव ठाकरे, असे तीन मुख्यमंत्री दिले. पण यापैकी एकालाही ५ वर्षाचा काळ पूर्ण करता आला नाही. दरम्यान १९९७ ते २०२२ तब्बल २५ वर्षे मुंबई महानगपालिकेवर सेनेला निर्विवाद सत्ता राखता आली.
२००६ मध्ये ठाकरे घराण्यात वैचारिक व कौटुंबिक फूट पडली व मनसेचा जन्म झाला. त्यानंतर २०२२ साली शिवसेनेत पुन्हा मतभेद उफाळून वर आले व एकनाथ शिंदे ४० आमदारासह फुटले व त्यांनी पक्षाचे नांव व चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगाने तो मान्य करत पक्षाचे नांव व चिन्ह शिंदे गटाला दिले. तर उद्धव यांच्या पक्षाला शिवसेना ( उबाठा ) हे नांव व मशाल चिन्ह दिले.
अशा सर्व परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा ६० वा दसरा मेळावा होत आहे. सध्या त्यांच्या पक्षाकडे केवळ २० आमदार आहेत. शिंदे गटाकडे तिप्पट आमदार आहेत. मुंबई महानगरपालिकेतील सत्ता देखील हातून निसटली आहे. अशा सर्व परिस्थिती उद्धव व राज या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकाच मंचावर येत आहेत.या नव्या समीकरणामुळे राज्याच्या राजकारणात काही बदल होईल, अशी शक्यता वाटत नाही. गेल्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या दोघांनी एकत्रितपणे लढवल्या पण त्यांना फारसे यश मिळाले नाही. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना त्यांच्या होम ग्राउंडवर पराभूत व्हावे लागले. अमितचा झालेला पराभव, त्यावेळी राज ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. या सर्व पार्श्वभूमीवर या मेळाव्यात विशेष असे काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

