दीपक मोहिते,
” घडलंय बिघडलंय,
परतीच्या पावसानेही दगा दिला ; रब्बी हंगाम धोक्यात,
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण उतरणीला लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कायम भितीच्या सावटाखाली असतात. अशी स्थिती असताना दरवर्षी ” परतीचा पाऊस,” मात्र दरवर्षी हमखास फटका देऊन जातो. यंदाही त्याची पुनरावृत्ती होईल, अशी भिती सर्वत्र व्यक्त करण्यात येत होती. पण घडलं भलतंच, परतीच्या पावसानेही ठेंगा दाखवला.त्यामुळे रब्बी हंगामातील पिकाच्या लागवडी रखडल्या आहेत.
यंदा देशात नैऋत्य मान्सून १२.६ % कमी झाला. २०१५ नंतरचा सर्वात कमी आणि २००१ नंतरचा चौथा सर्वात कमी मान्सून ठरला आहे. त्यामुळे राज्याच्या २६५ तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. वास्तविक ” परतीचा पाऊस,” हा कृषी क्षेत्राला मारक ठरत असतो. तरीही रब्बी पिके घेणारे शेतकरी यंदा या पावसाच्या प्रतिक्षेत होते. यंदा परतीच्या पावसाने १९ सप्टेंबर पासून माघारी जाण्यास सुरुवात केली. पण तो कधी माघारी गेला, हे शेतकऱ्यांना देखील कळले नाही. अखेर तीन दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने देशातून मान्सून गेल्याचे जाहीर केले. दरवर्षी ऑक्टो. च्या पहिल्या आठवड्यात जो नक्षत्राचा ( हत्तीचा पाऊस ) पाऊस पडतो, तो यंदा पडलाच नाही. परतीचा पाऊस न पडण्यामागे एकूण पाच कारणे आहेत, ती काय आहेत, त्याविषयी माहिती घेऊ.
१ ) अल निनोमुळे मान्सूनचे वारे कमकुवत झाले,
२ ) हिंद महासागारातील द्विध्रुव तटस्थ राहीला,
३ ) कमी दाबाच्या प्रणालीचा अभाव,
४ ) हवेत बाष्पाचे प्रमाण कमी असणे व सरासऱीपेक्षा तापमान अधिक राहीले,
५ ) यंदा हवामान विभागाने वातावरणातील बदल लक्षात घेऊन पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज जाहीर केला होता.

