दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
१९८० चा अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
” सत्तेसाठी काय पन,” सध्या या वाक्याचा आपण पावलोपावली अनुभव घेतोय. ज्या ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा भारतीय राजकारणात दबदबा होता, तो नुकत्याच झालेल्या पराभवानंतर ओसरत चालला आहे. बंगालची शेरनी आणि भावी पंतप्रधान म्हणून सतत गुणगान गाणारे त्यांचे सहकारी आता त्यांना सोडचिट्ठी देत आहेत. दोन महिन्यांपूर्वी जे भाजपला लाखोली वाहत होते, ते आज भाजपच्या तंबूत विसावले आहेत. सयानी घोष या ममता बॅनर्जी अत्यंत विश्वासू सहकारी, त्यांनी या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसची खिंड एकट्याने लढवली. मुळात प.बंगालच्या सिनेजगतातील त्या नावाजलेल्या पार्श्वगायिका व अभिनेत्री, ममता बॅनर्जी यांनी त्यांना राजकारणात आणले व खासदार बनवले. सुरुवातीला युवा व त्यानंतर महिला आघाडीच्या त्या अध्यक्षा झाल्या. ममता बॅनर्जी नंतर पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांची अल्पावधीत ओळख निर्माण झाली. त्या बंडखोरासमवेत भाजपमध्ये जातील, असे कोणालाही वाटले नव्हते. पण काल त्यांनी बंडखोरांच्या यादीवर स्वाक्षरी केली. त्यामुळे राजकारणात कोणी कोणाचे नसते, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. ममता बॅनर्जी यांचे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांच्या डोळ्यात गेल्या बारा वर्षांपासून खुपत होते. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, दिल्लीत अरविंद केजरीवाल व आता बंगालमध्ये ममता बॅनर्जी या तिघांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपने तमाम कटकारस्थाने केली. महाराष्ट्र व दिल्लीत ते यशस्वी झाले पण, प.बंगालमध्ये त्यांना ममता बॅनर्जी धूप घालत नव्हत्या. त्यांच्या
लोकप्रियतेसमोर त्यांचे काही चालत नव्हते. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत एसआयआर चे हत्यार उपसले व जवळपास ८० लाख मतदार हे मतदारयादीतुन वगळण्यात आले व प.बंगाल काबीज केले. असाच प्रयोग त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतही केला होता.
प.बंगालची निवडणूक ही ममता विरुद्ध मोदी/ शहा अशीच होती व ती या जोडगोळीने सरकारी यंत्रणा,निवडणूक आयोग व धनसंपत्ती याच्या बळावर जिंकली. ज्या लोकांना ममता बॅनर्जी यांनी राजकारणात आणून लहानाचे मोठे केले आज ती मंडळी सत्तेच्या हव्यासापोटी भाजपच्या दरबारात दाखल होत आहेत. सध्याचा भाजप हा १९८० चा भाजप राहिलेला नाही. त्याकाळी भाजपमध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी,यशवंत सिन्हा व जसवंतसिंह, अशा विचारवंत नेत्यांचा समावेश होता. आज निशिकांत दुबे,अजय बिधुरी व अजय मिश्रा,कुलदीप सेंगर सारखे बदनाम लोक संसदेत ” आरडाओरड गँग,” म्हणून सक्रिय आहे. त्यामुळे सध्याच्या भाजपकडून आपल्याला चांगल्या अपेक्षा बाळगता येणार नाहीत.

