दीपक मोहिते,
फ्रंटलाईन,
तुझ्या गळा,माझ्या गळा,
गुंफू कोट्यांच्या माळा,
महाराष्ट्र व प.बंगाल या दोन राज्यात सध्या फोडाफोडीच्या राजकारणाला चांगलाच वेग आला आहे. केंद्र व राज्यस्तरासोबत जिल्हा,तालुका व ग्रामस्तरावर देखील या प्रकाराला अक्षरशः उत आला आहे. अशा या गैरप्रकाराला राजकीय पक्ष मिशन लोटस व टायगर मिशन,अशी गोंडस नांवे देत असतात. कमळ हे चिखलात उगवत असले तरी ते आपल्या पाकळ्याना कधी चिखल लागू देत नाही, पण भाजपने ते आता चिखलाने पार माखून टाकले आहे. टायगर ( वाघ ) हा एकेकाळी जंगलावर आपले वर्चस्व राखून असायचा, आज त्या टायगरला जंगलात राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे तो नागरी वस्तीमध्ये मुक्तसंचार करू लागला आहे. जंगलात असलेल्या त्याच्या सोयी – सुविधाचा मानवाने फडशा पाडल्यामुळे त्याचा खाद्य व पाण्याच्या शोधात शहरात वावर वाढू लागला आहे.
आज त्यांचे नाव घेऊन अनेक कोल्हे हे टायगरच्या आवेशात डरकाळ्या फोडू लागले आहेत. पाच वर्षांपूर्वी भाजपने मिशन लोटस राबवून आमच्या कमळाची रया पार बिघडवून टाकली. कमळाचा वापर करताना राज्यभर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले, याविषयी भाजपला कधीच खंत वाटली नाही.आता ज्यांनी गोवाहाटीला जाऊन कामाक्षीदेवीच्या मंदिरात रेड्याचे बळी दिले, ते आता टायगरच्या मागे लागले आहेत. सध्या रेड्याना वाऱ्यावर सोडून त्यांनी आता टायगरचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. रेडे,टायगर व कोटी कोटींची उड्डाणे अशी त्रिसूत्री राबवण्यात भाजप व शिवसेना ( शिंदे ) हे दोघे यशस्वी झाले, पण या दोघांनी दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या केली. एकीकडे हे सारे घडत असताना दुसरीकडे जिल्हास्तरावर असलेल्या ठाणे मध्य.सह.बँकेच्या निवडणुकीत जी काही विचित्र युती झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरून सर्वसामान्य जनतेला कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. एकेकाळी भाजपचे किसन कथोरे व टायगर एकनाथ शिंदे यांच्यातून विस्तव जात नव्हता. ते आता ” तुझ्या गळा,माझ्या गळा,गुंफू कोट्यांच्या माळा,” अशा पद्धतीने वावरू लागले आहेत. दुसरीकडे ज्या टायगरने पाच वर्षांपूर्वी झालेल्या पालघर लोकसभा निवडणुकीत
माजी आ.ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे चिन्ह हिसकावून घेवून त्यांना रिक्षात बसवले ते माजी आ.ठाकूर त्यांच्या गळाभेटी घेत आहेत. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत शिंदे यांच्या एका ज्येष्ठ सहकाऱ्याला लाखो रु.घेऊन वाटप करण्यासाठी नालासोपारा शहरात आला असता ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहात पकडले होते. आज ते सर्वजण बँकेच्या निवडणुकीत एकत्र आले आहेत व ताठ मानेने व्यासपीठावर एकत्र बसलेले पाहायला मिळतात. यालाच आपण काळाचा महिमा म्हणतो.या सर्व घडामोडीवरून मतदारांनी काय बोध घ्यायचा तो त्यांनी घ्यावा.यातून आपण एकच निष्कर्ष काढू शकतो,तो म्हणजे ” सत्तेसाठी काय पन,” आणि ” शत्रुत्व केवळ एक दिखावा,” होय…

