वाडा प्रतिनिधी,
हजारो गरीब कुटुंबे मोफत योजनांपासून वंचित
गेल्या १८ वर्षांपासून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्व्हे न झाल्यामुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी,ग्रामीण आणि दुर्गम भागात अंत्यत हलाखीचे जीवन जगत असलेल्या हजारो कुटुंबियांना त्याचा फटका बसला आहे.१८ वर्षापुर्वी दारिद्र्य रेषेखालील यादीत नावे नसल्याने शासनाच्या अनेक योजनांचा लाभ या कुटुंबांना मिळत नाही, तर या यादीतील काही कुटुंबे,आज जी कुटुंबे सधन झाली असुन ते अद्याप शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत.
२००७ साली शासनातर्फे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्व्हे करण्यात आला होता.यावेळी पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक आदिवासी व ग्रामीण लोकवस्ती असलेल्या वाडा, जव्हार,विक्रमगड,मोखाडा या चार तालुक्यात ६५ हजाराहुन अधिक कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील यादीत होते.गेल्या १६ वर्षात या ६५ हजार कुटुंबापैकी अनेक कुटुंबे आता सधन झाली आहेत. अनेकांकडे दुचाकी,चारचाकी वाहने आली आहेत.तसेच काही कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत आहेत. असे असतानाही या कुटुंब प्रमुखाचे नांव दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट असल्याने या कुटुंबाला शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळत आहे.
मात्र गेल्या १६ वर्षात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची विभागणी होऊन नव्याने कुटुंबे निर्माण झाली आहेत. यामधील अनेक कुटुंबे ही अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत.या कुटुंबातील सदस्यांची नावे दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट नसल्यामुळे या कुटुंबातील सदस्यांना शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.
पालघर जिल्ह्यात हलाकिचे जीवन जगणारे व दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव नसलेल्या कुटुंबांची संख्या १५ हजाराहून अधिक असल्याचे कळते.
जव्हार तालुक्यात वास्तव्य असलेल्या सुमारे एक लाख चाळीस हजार कुटुंबे दारिद्र रेषा व प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहेत.या यादीत अनेक सधन कुटुंबांचाही समावेश आहे.ही सधन कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय मदतीचा लाभ राजरोसपणे घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जव्हार तालुक्यात एकूण ३१ हजार ३२८ शिधापत्रिकाधारक असुन यामध्ये १ लाख ४० हजार कुटुंब सदस्यांचा समावेश आहे.या तालुक्यात १ हजार २०२ शुभ्रशिधापत्रिकाधारक असुन यामध्ये ५ हजार ९०८ कुटुंबीय सदस्यांचा समावेश आहे.दारिद्रय रेषेखालील यादीत नांव नसल्यामुळे हलाखीचे जीवन जगणा-या ३ हजार ७२८ कुटुंबियांचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट न झाल्यामुळे त्यांना शासनाच्या मोफत योजनांचा लाभ मिळत नाही.
विक्रमगड तालुक्यात ३३ हजार ७८१ शिधापत्रिका धारक कुटुंबे असुन १ लाख ७२ हजार ९७० कुटुंब सदस्यांचा समावेश आहे. यामधील १६ हजार २१९ कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट आहेत.या कुटुंबातील ८९ हजार ५३७ सदस्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे.यामधील अनेक कुटुंबे ही सधन झालेली असतानाही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत.
वाडा तालुक्यात दारिद्र्य रेषेखालील यादीत असलेल्या कुटुंबांची संख्या १६ हजार ९७६ इतकी आहे.यामधील अनेक कुटुंबे देखील सधन असतानाही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत. तर अनेक कुटुंबे अत्यंत हलाखीचे जीवन जगत असतानाही त्यांचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत नसल्याने शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.शासनाच्या योजनापासुन वंचित राहिलेल्या गरिब कुटुंबांची संख्या १० हजाराहून अधिक आहे.

