वाडा प्रतिनिधी,
गावाला आत्मनिर्भर बनवणं हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा उद्देश,
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामविकासाच्या क्षेत्रात एक नवे पर्व ठरणार असून या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतींना आर्थिक स्वायत्तता,पारदर्शक कारभार आणि जबाबदार नेतृत्व प्रदान करणे हा आहे.गावोगाव रोजगार निर्मितीला चालना देणे,शेतीपुरक व लघुउद्योग वाढवणे महिलांचे सबलीकरण करणे तसेच आरोग्य व शिक्षण क्षेत्रात भरीव बदल घडवून गावाला आत्मनिर्भर बनवणे हा या उपक्रमाचा गाभा असल्याची माहिती खासदार डाॅ.हेमंत सवरा यांनी वाडा येथे बोलताना दिली.
ग्रामविकास विभागातर्फे राबवण्यात येणा-या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन वाडा येथील पां.जा.विद्यालय सभागृहात करण्यात आले होते.त्यावेळी केलेल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात ग्रामपंचायतींनी आपले कार्य पारदर्शक पध्दतीने करावे,नागरिकांचा विश्वास संपादन करावा आणि विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावाच्या विकासात आपला वाटा उचलावा,असे आवाहन केले.तसेच गावक-यांचा सक्रिय सहभाग,श्रमदान आणि स्वच्छतेबाबत जागरूकता यामुळे हे अभियान यशस्वी होईल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे केवळ पुरस्कारापुरते मर्यादित नसून गावागावात शाश्वत विकासाचे मॉडेल उभारणे, सामाजिक न्यायाची अंमलबजावणी पर्यावरणीय संवर्धन आणि लोकसहभागातुन लोकचळवळ उभी करणे हे त्यामागचे खरे उद्दिष्ट असून या माध्यमातून तालुक्यातील ग्रामपंचायती अधिक सक्षम स्वावलंबी आणि आदर्श बनतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.तर कार्यशाळेसाठी मास्टर स्टेनर म्हणून ग्रामपंचायत खानिवलीचे सरपंच भरत हजारे व ग्रामपंचायत अधिकारी दिपक पाटील यांनी अभियानाबद्दल विस्तृत माहिती दिली.
कार्यशाळेस विविध विभागातील अधिकारी कर्मचारी,सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी, रोजगार सेवक आदी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विभागाचे संजय फराड व मुख्याध्यापिका साधना भानुशाली यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

