दीपक मोहिते
प्रताप सरनाईक,उदय सामंत व भरत गोगावले यांची मनोर येथे संयुक्त बैठक,
आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे ) पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी वसई-विरार शहर मनपाच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.या रणनीतीचा भाग म्हणून ११ सप्टें.रोजी सकाळी मनोर येथील सायलेंट रिसॉर्टमध्ये परिवहनमंत्री प्रताप सरनाईक,उदय सामंत व भरत गोगावले यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली विशेष बैठक होणार आहे.
या मोहिमेचा बlभाग म्हणून त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता वसई-विरार महापालिका मुख्यालयात लोकदरबाराचेही आयोजन करण्यात आले आहे.या माध्यमातून वसई-विरारकरांच्या समस्या-अडचणी आणि तक्रारींना न्याय देण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे.हा लोकदरबार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्त्वाखाली आयोजित करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्रीपदी असताना शिंदे यांनी अनपेक्षित असे अनेक राजकीय निर्णय घेतले आहेत.त्यांच्या या निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे त्यांची महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता वाढली आहे.वसई-विरार शहरावरही त्यांनी तितकेच प्रेम दाखवले आहे.
तीन वर्षांपूर्वी बहुजन विकास आघाडीचे आ.हितेंद्र ठाकूर यांनी विधानसभेत वसई-विरारला सरकारकडून न्याय मिळत नसल्याची जाहीर तक्रार केली होती.त्यावेळी ” शिकायत का मौका नही दुंगा,” असे सांगत वसई-विरारकरांच्या हृदयाला त्यांनी हात घातला होता. त्यानंतर विरार येथील विवा कॉलेजात पार पडलेल्या साहित्य संमेलन उद्घाटन सोहळ्यातही वसईचा निसर्ग आणि शहरवासीयांचे कौतुक करत वसई-विरारमधील प्रस्तावित विकासकामांसाठी ६०० हून अधिक कोटींच्या निधीची तरतूद केली असल्याची जाहीर घोषणा केली होती.
त्याआधी २०१७ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांनी विशेष कामगिरी पार पाडली होती.किंबहुना या निवडणुकांमध्ये तत्कालिन सत्ताधारी बहुजन विकास आघाडी आणि त्यांच्या नेत्यांची प्रचंड दमछाक झाली होती.विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा पराजय होऊन वसईत परिवर्तन घडले आहे.एकनाथ शिंदे हे महायुतीत असल्याने महापालिका निवडणुकीत त्यांच्या पक्षाला जागा वाटपात घसघशीत वाटा मिळण्याची अपेक्षा आहे.
त्यादृष्टीने एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा वसई-विरारवर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
वसई-विरारकरांच्या अपेक्षा एकनाथ शिंदे यांच्याकडून पुन्हा एकदा उंचावल्या असून या सगळ्या पार्श्वभूमीवर ११ सप्टें.रोजी सायलेंट रिसॉर्टमध्ये मंत्री प्रताप सरनाईक,उदय सामंत व भरत गोगावले यांच्या उपस्थितीत होत असलेली विशेष बैठक व त्यानंतर लागलीच वसई-विरार महाालिकेत होत असलेला लोकदरबार हा एकनाथ शिंदे यांच्या धक्कातंत्राचा भाग मानला जात आहे. या माध्यमातून वसई-विरार महापालिका निवडणुकीसंदर्भात शिवसेना मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

