जव्हार प्रतिनिधी,
रानभाज्या महोत्सवातून उत्पन्न वाढीची संधी,
अनुसूचित जमातीतील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व त्यांच्या पारंपरिक रानभाज्या तसेच औषधी गुणधर्म असलेल्या पदार्थांची सार्वजनिक प्रसार व प्रसिद्धी करण्याच्या उद्देशाने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
 जव्हार,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,प्रकल्प अधिकारी डॉ.अपूर्वा बासुर यांच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, केंद्रवर्ती अर्थसंकल्प ( न्युक्लिअस बजेट ) अंतर्गत सन २०२५-२६ या योजनेंतर्गत जव्हार,मोखाडा,विक्रमगड व वाडा तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना या महोत्सवात सहभागी होता येणार आहे.
  या महोत्सवाच्या माध्यमातून गावागावात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या,रानफळे,वनौषधे तसेच अन्नधान्य यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना आर्थिक उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून,या औषधी गुणकारी रानभाज्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होईल.त्याशिवाय, महोत्सवात सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना आवश्यकतेनुसार वजनकाटा,कॅरेट,फोल्डिंग स्टॉल,प्लास्टिक टेबल आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच गावोगावी होणाऱ्या मेळाव्यांमध्ये शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचाही उपक्रम राबवण्यात येणार आहे.
  या महोत्सवामुळे रानभाज्यांच्या पाककला कौशल्याला प्रोत्साहन मिळेल, स्थानिक बाजारपेठ व पर्यटनस्थळांवर विक्रीतून आदिवासी लाभार्थ्यांचे उत्पन्न वाढेल,असा विश्वास  जव्हार ,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,प्रकल्प अधिकारी डॉ.अपूर्वा बासुर यांनी व्यक्त केला.

 
									 
					

