वसंत भोईर, वाडा
वाडा येथे प्रदूषणकारी टायर कंपनीच्या परवानगीचा उफाळला वाद,
तालुक्यातील कोनसई या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये आशा इंड्रस्टीज या टायर कंपनीने परवानगी मागीतली होती.या परवानगीच्या ठरावाला ग्रामस्थांचा सक्त विरोध असताना राजकीय दबावापोटी ग्रामपंचायत अधिकारी पंकज चौधरी यांनी ती देण्याची तयारी चालवली होती.त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्यांना काही तास ग्रामपंचायत कार्यालयात घेराव घातला.ग्रामस्थ आक्रमक झाल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलीस आल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
या प्रदूषणकारी कंपनीला देण्यात आलेल्या परवानगीमुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,तालुक्यातील कोनसई या गावातील नागरिकांनी ग्रामसभेत प्रदूषणकारी कंपन्या कायमच्या बंद करण्याकरिता व भविष्यामध्ये प्रदूषण कारी कंपन्याना परवानगी देण्यात येऊ नये असा ठराव क्रमांक १ ( १ ) घेण्यात आला होता.असे असताना आशा इंडस्ट्रीज या टायर कंपनीसाठी परवानगी मागण्यात आली होती.ही टायर कंपनी एका आमदाराच्या नातेसंबंधातील असल्याने तो आमदार प्रशासानावर दबाव टाकत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.नुकत्याच झालेल्या 22 ऑगस्ट 2025 च्या ग्रामसभेत आशा इंडस्ट्रीजच्या टायर कंपनीला परवानगी बाबतचा मुद्दा चर्चेत आला होता पण हा मुद्दा खोडून काढण्यात आला.मात्र ग्रामपंचायत अधिकारी पंकज चौधरी यांनी हा ठराव घाईघाईत मंजूर करून ते ग्रामसभा सोडून ग्रामपंचायत कार्यालयात निघून गेले.त्यामुळे संतापलेले ग्रामस्थही ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन पंकज चौधरी यांना घेराव घालून त्याचा जाब विचारला.ग्रामस्थ आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांना पाचारण करण्यात आले अन काही तासानंतर त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
कोनसई गावाच्या क्षेत्रात कार्यरत असणा-या टायर कंपन्यांना शासनाने टाळे ठोकलेले असताना आता आशा इंडस्ट्रीज या कंपनीला परवानगी कशासाठी ? असा रोखठोक सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.या “आशा इंडस्ट्री,” कंपनीमुळे गावाचा श्वास रोखणाऱ्या टायर कंपनीला आमदार मात्र ऑक्सिजन पुरवत आहेत.हे आमदार लोकप्रतिनिधी आहेत की उद्योग प्रतिनिधी?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे, “ शेती, जनावरांचे आरोग्य,पाण्याचा स्रोत आणि गावातील वातावरण यावर या कारखान्याचा गंभीर परिणाम होणार आहे.गावकरी जिवाच्या आकांताने विरोध करत असताना आमदार उद्योगपतींची बाजू घेत आहेत. हे लाजिरवाणे असल्याचे सुनील अमृत मोकाशी या ग्रामस्थाने सांगितले.
ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल करण्याची तयारी चालवली आहे.
यासंदर्भात सरपंच कैलास टोके व ग्रामपंचायत अधिकारी पंकज चौधरी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

