वसंत भोईर,वाडा
आठ दिवसांच्या अतिवृष्टीने भातशेतीचे मोठे नुकसान
वाड्यात गेले आठ दिवस विश्रांती न घेता धो-धो कोसळणा-या पावसाने अखेर आज उसंत घेतली आहे.त्यामुळे येथील नागरिकांना आज सुर्यदेवाचे दर्शन झाले.
गेले आठ दिवस सतत मुसळधार कोसळणा-या पावसामुळे
तालुक्यात सर्वत्र पुरपरिस्थीती निर्माण झाली होती.या अस्मानी संकटात शेतकऱ्यांसह अनेक नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.नदी,नाले,ओहोळ तुडूंब भरून दुथडी भरून वाहत असल्यामुळे येथील जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले होते.भातलागवड करण्यात आलेल्या शेतजमिनीला अक्षरश : पुराने विळखा घातला होता.आठ दिवस शेतजमीन पाण्याखाली राहील्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.या अतिवृष्टीचा विपरीत परिणाम भातशेतीवर मोठ्या प्रमाणात झाला असून अनेक शेतकऱ्यांची भात लागवड कुजून वाया गेली.शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत.
वाडा तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो.येथील वाडा कोलम हा देशात प्रसिद्ध आहे.अनेक संकटांवर मात करून येथील शेतकरी हा आपली शेती करत आहे.मात्र या अतिवृष्टीत भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे,अशी मागणी शेतकरी अशोक पाटील ( पासोरीपाडा ) यांनी केली आहे.

