वसंत भोईर,वाडा
लाळ्या-खुरकत रोगप्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ,
वाडा तालुक्यात लाळ्या खुरकत रोगाची बाधा होऊ नये यासाठी गुरांच्या लसीकरणाच्या ७ व्या फेरीचा शुभारंभ नुकताच पालघर येथे करण्यात आला. जिल्हा पशुसर्वचिकित्सालय येथील सहाय्यक आयुक्त डॉ. शिल्पा कारगिलवार यांच्या हस्ते नेहरोली येथे करण्यात आला.यावेळी पशुपालक तसेच पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
वाडा तालुक्यात २० व्या पशुगणनेनुसार २२ हजार ७४ गोवर्गीय तसेच १० हजार ९१८ म्हैस वर्गीय असे एकूण ३२ हजार ९९२ एवढे पशुधन आहे.
काही दिवसापूर्वी तालुक्यातील चिखले,कोणे, मालोंडे,नेहरोली या गावामधील काही पशुपालकांच्या जनावरामध्ये खुरामध्ये जखमा झाल्यामुळे जनावरे लंगडत असल्याची माहिती पशुपालकांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे दिली होती.जिल्हा स्तरावर याची तातडीने दखल घेऊन वाडा तालुक्यात लाल्या खुरकत रोग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यास सुरवात करण्यात आली आहे.
या बाबतीत तालुका लघु पशुसर्वचिकित्सालय वाडा येथील सहा.आयुक्त डॉ.हेमंत कुलकर्णी यांनी लंगडणाऱ्या जनावरांवर उपचार करण्यात येत असून त्यातील काही जनावरे बरी होत असल्याचे सांगितले.तसेच डॉ.कारगिलवार यांनी अचूक रोग निदानासाठी जनावरांचे रक्तजल नमुने पुणे येथे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ.कुलकर्णी यांनी सदरील लसीकरण मोहीम ही २७ ऑगस्ट पर्यंत राबवण्यात येणार आहे.सर्व पशुपालकांनी लाळ्या खुरकत रोगाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

