दीपक मोहिते,
सुविधांमुळे अतिवृष्टीमध्ये नागरिकांना मिळाला दिलासा,
वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात आज प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शहरातील काही ठिकाणी सखल भाग व रस्त्यांवर पाणी साचले होते, तसेच काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले होते. महानगरपालिकेतर्फे जलमय झालेल्या भागातील पाणी काढण्यासाठी ५४ संक्शन पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे.संक्शन पंप लावून विविध ठिकाणी साचलेले पाणी काढण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी जेसीबी द्वारे पाणी जाण्याचे मार्ग मोकळे करण्यात आले असून काही ठिकाणी पाणी काढण्याचे काम सुरू आहे. 
महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एनडिआरएफ ची एक टीम ही कार्यरत ठेवण्यात आली आहे.
पावसाचे पाणी साचल्यामुळे जेथे नागरिक अडकले होते, त्या ठिकाणी महापालिकेच्या रेसक्यू टीमतर्फे ट्रॅक्टर- ट्रॉली, अग्निशमन वाहने तसेच लाईफ बोटीद्वारे नागरिकांची सुटका करण्यात आली व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले. महानगरपालिका क्षेत्रातील दरड प्रवण क्षेत्र,भूस्खलन क्षेत्रांना मनपा अधिकाऱ्यांनी भेटी देवून तेथील नागरिकांचे स्थलांतर मनपाच्या तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या प्रभाग समिती निहाय एकूण ३४ तात्पुरती निवारा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.दुपारपर्यंत पावसाचे पाणी साचल्यामुळे अडकलेल्या ४९७ नागरिकांची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.काहींना मनपाच्या तात्पुरत्या निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले आहे.केंद्रात त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. तसेच ज्या घरांमध्ये पाणी शिरले होते, तेथील नागरिकांनाही मनपातर्फे जेवणाची पॅकेट्स पुरवण्यात येत आहेत. दुपारपर्यत १० हजाराहून अधिक जेवणाची पॅकेट्स वाटप करण्यात आले असून हे वाटप पुढेही सुरूच राहणार आहे.
शहरात आज ०५ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या.अग्निशमन विभागाकडून ट्री कटर च्या साहाय्याने पडलेली झाडे हटवण्यात आली आहेत. काही ठिकाणी कचरा अडकून बंद झालेली गटारे, चेंबर, रस्त्यावरील मॅनहोल कर्मचाऱ्यांकडून साफ करून पाण्याचा निचरा सुरळीत करण्यात येत आहे.
आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी आज पावसाचे पाणी साचलेल्या विविध ठिकाणी भेटी देवून साचलेल्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर करणे बाबत,तसेच तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे बाबत कर्मचाऱ्यांना आदेश दिल्या.
आयुक्तानी आचोळे येथील मुख्य अग्निशमन कार्यालयाला भेट देवून शहरातील संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली व संबंधित अधिकाऱ्यांना आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना दिल्या.
हवामान विभागाने पुढील २ दिवसात जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली असल्यामुळे नागरिकांनी महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये,असे आवाहन आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.
या आपत्ती काळात नागरिकांच्या सेवेसाठी महानगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात असून काहीही अडचण आल्यास नागरिकांनी महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन केंद्रांशी संपर्क करावा.महानगरपालिका या आपत्ती काळात नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून नागरिकांनीही महनगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त सूर्यवंशी यांनी केले आहे.

