आदिवासींच्या संसाराला गवताच्या काडीचा आधार,
वसंत भोईर
गवत विक्रीचा भूमिपुत्रांना आधार,
पालघर जिल्ह्यातील आदिवासींना पावसाळ्यातील चार महिन्यांपैकी दोन महिने शेती कामांमध्ये रोजगार मिळतो,मात्र उर्वरित दोन महिने त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे गांव परिसरातील हिरवे गवत कापून त्याच्या विक्रीतून संसारला आधार उपलब्ध होत असतो.
प्रतिवर्षी येथील आदिवासींना या माध्यमातून चांगला रोजगार मिळतो.
जिल्ह्यातील डहाणू,तलासरी, जव्हार,मोखाडा,विक्रमगड, वाडा या तालुक्यातील हजारो आदिवासी कुटुंबे उन्हाळ्यातील आठ महिने रोजगारासाठी शहरी भागात स्थलांतर करत असतात तर उर्वरित चार महिने आपल्या मूळगावी परतून शेती,मजुरी करतात.पावसाळ्यात शेतीची कामे संपल्यानंतर गांव परिसरातील माळरानावर उगविलेले गवत विक्रीतून प्रति दिवस, ३०० ते ५०० रु. कमवतात. या हंगामात कुठेही रोजगार उपलब्ध नसताना हजारो आदिवासी कुटुंबाना हिरवे गवत विक्रीतून संसारला चांगला आधार मिळतो.
हिरव्या गवताला मुंबई, वसई,कल्याण व आजुबाजुच्या उपनगरात असलेल्या तबेल्याकडून खुप मागणी असते.या मागणीचा लाभ येथील गवताचा व्यवसाय करणारे व्यापारी घेत असतात.ते या परिसरातील आदिवासी बांधवांकडून गवत विकत घेऊन ते तबेलांच्या मालकापर्यंत पोहोचवतात. जिल्ह्यातील अनेक तरुण या व्यवसायात उतरले असुन गवताची वाहतुक करण्यासाठी त्यांनी भाड्याने ट्रक घेतले आहेत.
चौकट –
ग्रामीण भागात भात लावणीची कामे संपल्यानंतर येथील मजुरांना काम नसल्याने त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट ओढवते. मात्र ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्याच्या कालावधीत ग्रामीण भागातील माळरानावर उगवणा-या हिरव्या गवताला शहरी भागात असणा-या म्हशीच्या तबेला मालकांकडून खुप मागणी असते. या मागणीतूनच येथील आदिवासींना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.१० किलो वजनाच्या गवताच्या भा-याला २० ते २५ रु. दर मिळतो.
कोट
या व्यवसायातून आदिवासी भागातील मजुरांना रोजगार, अनेक तरुणांच्या हाताला काम, ट्रक, टेम्पो वाहतुकदारांना रोज वाहन भाडे तर शहरी भागातील दुभत्या जनावरांना हिरवा चारा अशा माध्यमातून सर्वांचेच हित साधणारा हा व्यवसाय आहे.
दिलीप पाटील – गवत विक्री व्यवसायीक, वाडा.

