सचिन सावंत,विरार
मालवाहू जहाजाची मच्छीमार नौकेला जोरदार धडक ; चौदा खलाशांचे प्राण वाचले,
समुद्रकिनाऱ्यापासून तीन नॉटिकल मैल अंतरावर भर समुद्रात ” श्री साई,” या मच्छीमार बोटीला काल रात्री एका मालवाहू जहाजाने जोरदार धडक दिली.
या घटनेची माहिती मिळताच ” जय साईप्रिया,” आणि ” जय साईराम, ” या दोन बोटींनी अपघातग्रस्त नौकेला मदत केली.त्यामुळे १४ खलाश्याचे प्राण वाचू शकले.
१४ ऑगस्ट रोजी रात्री ९.२५ च्या सुमारास ” श्री साई,” ही मासेमारी बोट समुद्रात असताना एका मालवाहू जहाजाने तिला जोरदार धडक दिली.या धडकेमुळे बोटीवर असलेले १५ पैकी ४ खलाशी समुद्रात फेकले गेले.काळोख असल्याने त्यांना कसेबसे पुन्हा बोटीजवळ येणे शक्य झाले.
अपघाताची माहिती मिळताच ” श्री साई, ” बोटीचे सहमालक संतोष तरे यांनी तात्काळ वायरलेसद्वारे जवळच्या ” जय साईप्रिया,” बोटीचे तांडेल जितेंद्र तरे यांना मदतीसाठी संदेश पाठवला.संदेश मिळताच जितेंद्र तरे यांनी ” साईप्रिया,” आणि ” जय साईराम, ” बोटीचे तांडेल शांताराम ठाकरे यांच्यासह अपघातस्थळी धाव घेतली व त्यांनी अथक प्रयत्न करून सर्व खलाशांना सुरक्षित बाहेर काढले.

