वसंत भोईर,वाडा
ग्रामीण भागातील हिरवाई वाढणे व आदिवासी सक्षमीकरणासाठी संकल्प,
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण पाड्यांमध्ये वनशक्ती या स्वयंसेवी संस्थेने रिलायन्स फाऊंडेशन आणि सुखभूमी इंडिया ट्रस्ट यांच्या सहकार्याने कलम केलेल्या फळझाडांची रोपे वाटप करण्यात आली.
पवारपाडा आणि नेवालपाडा येथील आदिवासी महिलांना,यावर्षीही ही फळझाडांची रोपे देण्यात आली.
या उपक्रमामुळे तानसा खोऱ्यातील हिरवाई वाढणार आहे.मृदा धूप रोखण्यास मदत होईल आणि जैवविविधतेचे संवर्धन साधले जाईल. फळझाडे वातावरणातील कार्बन शोषून घेतात,ज्यामुळे हवामान बदलाच्या परिणामांना आळा घालण्यास मदत होते.याशिवाय,या झाडांमुळे स्थानिक पक्षी व कीटकांना आश्रय मिळेल, पाण्याचा साठा वाढेल आणि स्थानिक परिसंस्था अधिक सक्षम बनेल.
स्थानिक महिलांना मिळालेल्या या रोपांमुळे केवळ पोषणाचा स्रोत उपलब्ध होणार नाही, तर काही वर्षांत फळांच्या विक्रीमुळे अतिरिक्त उत्पन्नाचाही लाभ मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचाही एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
वनशक्ती संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक विकी पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, “ हा उपक्रम फक्त झाडे लावण्यापुरता मर्यादित नाही, तर निसर्गाचे संरक्षण आणि स्थानिकांचे जीवनमान उंचावण्याची दीर्घकालीन व शाश्वत प्रक्रिया आहे.”

