वाड्यात आठवडाभर पावसाची दांडी,शेतकरी चिंतेत,
वाड्यात गेल्या आठवड्या पासून पावसाने दांडी मारली असून भात लागवड केलेली शेतजमिनी सध्या कोरड्या पडल्या आहेत.शेतजमीन पावसाअभावी सुकून भेगा पडून रोपाची मुळं तुटण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
भात लागवड केल्याच्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे शेतजमिनी पूर्णतः सुकून तडकू लागल्या आहेत.भातरोपे कोमजून गेली आहेत.याचा विपरित परिणाम भात पिकावर होण्याची शक्यता आहे.पाऊस काही दिवसात पडला नाही,तर भातशेतीचे मोठे नुकसान होईल अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
वाडा तालुक्यात सध्या गरवी भातशेतीच्या तुलनेत हळवार भातशेती मोठ्या प्रमाणात करण्यात येते.यात मोठे क्षेत्र वनपट्ट्यात येत असून रानमाळासह डोंगरदऱ्यातही मोठ्या प्रमाणावर हलवार भातपिकाची लागवड केली जाते.हलवार शेतजमीन ही पावसावर अवलंबून असते. त्यामुळे पुढील काही दिवसात पाऊस पडला नाही तर भात शेतीचे मोठे नुकसान होईल, अशी भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
अनेक संकटांचा सामना करत जिल्ह्यातील शेतकरी हा भातशेती करत असतो.येथील शेती ही पूर्णतः पावसावर अवलंबून आहे.वाड्यात कारखान्यांचे मोठे जाळे असून अनेक कंपनी मालकांनी सोयीनुसार आपल्या जागेवर विटा, दगडांनी पक्के कुंपण करून घेतले आहे.परिणामी पूर्वापार असलेले नैसर्गिक ओहोळ,नाल्यातील पाण्याचे प्रवाह बंद झाले आहेत. भातशेतीसाठी इतर पाण्याचे पर्याय नसल्यामुळे शेतकरी आता पावसाच्या पुनरागमनाची वाट पाहत आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
पावसाअभावी शेतजमिनीत पाण्याचे प्रमाण कमी असल्याने लागवड केलेली भातरोपे लालसर पडली असून पूर्णतः कोमेजून गेले आहे.त्यामुळे इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहिली, तर याचा फटका भातशेतीला बसेल,असे या भागातील शेतकरी प्रभाकर पाटील यांनी सांगितले.

