वसंत भोईर,वाडा
वाडा- भिवंडी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाला ब्रेक,
वाडा- भिवंडी महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. शासनाने या मार्गासाठी आठशे कोटीचा निधी मंजूर करून या कामाचा ठेका ईगल कंपनीला दिला आहे.परंतु,झालेल्या कामाचे बिल शासनाकडून अदा करण्यात न आल्याने या कंपनीने काम बंद केले आहे. गेल्या सहा दिवसापासून हे काम बंद झाले असुन या रस्त्यावर सध्या खड्ड्याचे सम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी त्याची अवस्था बिकट झाली आहे.मडक्याचा पाडा येथील एका तरुणाचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला.हा संपूर्ण महामार्गच खड्डेमय झाला असून वाहनचालक मेटाकुटीस आले आहेत.
प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाने आक्रमक पवित्रा घेत गुरु. ७ ऑगस्ट रोजी कुडूस नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.गणेशोत्सव तोंडावर आला असून हा रस्ता तातडीने वाहतुकीसाठी योग्य करावा,अशी मागणी उपजिल्हाप्रमुख गोविंद पाटील यांनी केली आहे.

