वसंत भोईर,
जिल्हा वर्धापनदिन विशेष,
कृषिप्रधान पालघर जिल्ह्याची ओळख हरवतेय…
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्याला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत.नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याची सागरी,डोंगरी,आणि नागरी अशी विभागणी झाली असली तरी कृषी क्षेत्रात विविध उत्पादने घेणारा जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ओळखला जातो.परंतु जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्यातील कृषीक्षेत्राकडे
झालेल्या दुर्लक्षामुळे कृषिप्रधान जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसली जातेय की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पालघर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर भातशेती केली जाते.बहुसंख्य भागात शेतकरी भाताचे उत्पादन घेत आहे.यात प्रामुख्याने वाडा तालुक्यासह डहाणू,पालघर, वसईच्या ग्रामीण भागात घेण्यात येणाऱ्या ‘वाडा कोलम’, ‘झिनी’ ह्या भाताला देशभरात लौकिक मिळाला आहे.बाजारपेठेत वाडा कोलम आणि झिनीच्या तांदळाला मोठी मागणी आहे.परंतु लहरी हवामान,अवेळी पडणारा पाऊस,परतीच्या पावसामुळे भातशेतीचे होणारे नुकसान, शासनाची उदासीनता इ. कारणामुळे वाडा कोलम, आणि झिनीचे पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या रोडावली आहे.त्यातच वाडा कोलम आणि झिनीच्या नावाने बनावट तांदूळ बाजारपेठेत विकला जाऊ लागल्यामुळे मूळ उत्पादन घेणारा शेतकरी अडचणीत आला आहे. पालघर जिल्ह्याची ओळख असलेल्या वाडा कोलम आणि झिनीच्या पिकांचे उत्पादन वाढावे,त्याचे संवर्धन व्हावे, म्हणून शासनाने आजवर कोणतेही प्रयत्न केले नाहीत.
डहाणू तालुक्यातील ‘चिकू,’ हा जगप्रसिद्ध आहे.डहाणू तालुक्यातील घोलवडच्या चिकूला देशभरात मान्यता मिळाली आहे.परंतु लहरी हवामान,वाढते प्रदूषण यामुळे चिकू उत्पादक शेतकरीही संकटात सापडला आहे. चिकूमुळे पालघर जिल्ह्याला वेगळी ओळख मिळाली आहे. परंतु चिकू प्रक्रिया उद्योग निर्माण व्हावे,म्हणून जिल्हा निर्मितीनंतर काही प्रयत्न होतील,अशी अपेक्षा होती. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे शासकीय स्तरावरून कोणतेही प्रक्रिया उद्योग उभे राहिले नाहीत. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर चिकूचे उत्पादन घेतले जात असतानाही हक्काची बाजारपेठ,निर्यात धोरणासाठी जिल्हा निर्मितीनंतर प्रयत्न झाले नाहीत.त्यामुळे संधी असूनही डहाणूतील चिकूला देशाच्या आणि जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.
तर जव्हार,मोखाडा तालुक्यात नागली आणि वरईचे पिक मोठ्याप्रमाणात घेतले जाते. मात्र अवेळी पडणाऱ्या पावसामुळे येथील शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. पारंपारिक पद्धतीने होणाऱ्या नागली वरईची शेती ही निसर्गावरच अवलंबून आहे. कधी अवेळी पडणारा पाऊस तर कधी पावसाने ओढ दिल्याने डोंगरी भागात लागवड केलेली नागली – वरईची उभी पिके नष्ट झाल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत.नागली आणि वरईला बाजारपेठेत चांगली मागणी आहे.वरईपासून बनवण्यात येणाऱ्या भगरीला गुजरातसह अन्य राज्यात मोठी मागणी आहे.मात्र त्याकरिता खाजगी व्यापाऱ्यांवर येथील शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे.जिल्हा विभाजनानंतर नागली आणि वरईच्या पिकांना हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून प्रयत्न होणे अपेक्षित होते. सहकारी तत्वावर अथवा शासकीय भगर मिल उभारून येथील शेतकऱ्यांच्या वरईच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र जिल्हा निर्मितीनंतरही येथील शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांवरच अवलंबून राहावे लागत आहे.
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील सुकेळी जगप्रसिद्ध आहेत.राजेळी जातीच्या केळींचे वसई तालुक्यात उत्पादन घेतले जाते.ही केळी तयार झाल्यानंतर नैसर्गिकरीत्या विशिष्ट पद्धतीने पिकवून उन्हात सुकवली जातात. या सुकेळीना बाजारपेठेत चांगली मागणी आहे आणि वसईलाही सुकेळीमुळे वेगळी ओळख मिळाली आहे.परंतु बदलत्या हवामानामुळे हा सुकेळीचा व्यवसायही अडचणीत सापडला आहे.पालघर जिल्ह्याला ओळख देणारा हा शेती व्यवसाय टिकावा व वाढवा म्हणून शासनाकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.त्यामुळे पारंपारिक पद्धतीने करण्यात येणारी सुकेळी शेतीपासून येथील शेतकरी दुरावला गेला आहे.
तर विक्रमगड तालुक्यातील शेतकरी गेल्या दहा वर्षात मोगरा लागवडीकडे वळले आहेत.येथील शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात मोगऱ्याची लागवड केली आहे. या फुलशेतीतून येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे येवू लागलेत.मात्र त्याकरिता मुंबईच्या बाजारपेठेत हा मोगरा विकावा लागतोय. त्याकरिता गटा – गटाने ही विक्री यंत्रणा शेतकऱ्यांनी उभारली आहे.मोगरा शेतीतून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असले तरी लहरी हवामानामुळे मोगरा फुलशेती दरवर्षी संकटात सापडत आहे.अनेक रोगांचा प्रादुर्भाव या मोगऱ्यावर झाल्यामुळे उत्पादनात घट होत आहे.मोगऱ्याच्या शेती सारख्या आर्थिक संपन्नता देणाऱ्या शेतीपूरक व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी वळावे,यासाठी शासन प्रयत्न करत नाही.मोगरा शेतीला हक्काचे बाजारपेठ मिळावी, म्हणून शासन स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून मोगऱ्याचा अर्क काढून अत्तर निर्मिती सारख्या उद्योगाकडे वळवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा मोगरा शेती व्यवसायही अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
पालघर जिल्ह्याला शेती व्यवसायातील विविध उत्पादनामुळे एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.जिल्ह्यातून अनेक नद्या वाहतात पण सिंचनाच्या अपुऱ्या सोयीसुविधांमुळे येथील शेतकऱ्यांना केवळ हंगामी शेतीवर अवलंबून राहावे लागत आहे.सिंचनक्षेत्र वाढावे म्हणून प्रयत्न होत नाहीत.शासनाचे शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे हा पारंपारिक शेतीव्यवसाय आता अडचणीत आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याची कृषिप्रधान जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसण्याचीच अधिक भीती निर्माण झाली आहे.

