दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
ऐन निवडणुकीच्या तोंडावर बविआमध्ये त्सुनामी येऊ शकते…
वसई-विरार परिसरात सक्तवसुली संचलनालयाची एंट्री ही बहुजन विकास आघाडी व शिवसेनेला ( शिंदे गट ) डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.पवार प्रकरण उकरून काढून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.महाप्रतापी अनिलकुमार पवार,हा एकनाथ शिंदे गटाच्या कोट्यातील अधिकारी आहे,तसेच तो शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा नातेवाईक आहे.गेल्या काही काही दिवसांपासून शिंदे गटाच्या अनेक आमदारांचे पाय खोलात अडकले आहेत.या प्रकरणामुळे भाजपच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पवार प्रकरण,हे भाजपच्या पथ्यावर पडणारे आहे.
तर दुसरीकडे अनेक बिल्डर्स,ठेकेदार व आर्किटेक्ट देखील ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत.त्यामुळे आ.ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या आर्थिक नाड्या या माध्यमातून आवळण्याचा भाजपचा प्रयत्न काही अंशी यशस्वी झाला आहे.भाजप पवार प्रकरणाचा वापर जागावाटपा दरम्यान करण्याची शक्यता आहे.दादा भुसे यांच्या नावाने त्यांनी आतापासूनच खडे फोडण्यास सुरुवात केली आहे.या माध्यमातून भाजप,शिंदे गटाची जेवढी बदनामी करता येईल,तेवढी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होईल.विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर हतबल झालेली बहुजन विकास आघाडी अद्याप सावरलेली नाही.अशा परिस्थितीत त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या तर त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुका देखील जड जातील.त्यांच्या पक्षाच्या अनेक माजी नगरसेवकांना भाजप ईडीच्या सापळ्यात अडकवतील,अशी शक्यता आहे.वसई-विरार शहर महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते.दरम्यान बहुजन विकास आघाडीचे नेते राजीव पाटील,हे पक्षाच्या बॅनर्सवर पाहायला मिळत असले तरी प्रत्यक्षात ते पक्षाच्या कार्यक्रमाकडे सध्या फिरकत नाहीत.त्याऐवजी ते भाजपच्या वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावत असतात.हा झालेला बदल पक्षाच्या मुळावर येणारा आहे.राजीव पाटील यांचे भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावण्यामुळे कार्यकर्ते देखील संभ्रमावस्थेत सापडले आहेत.या सर्व घडामोडी पक्षाला त्रासदायक ठरणाऱ्या आहेत.पक्ष सध्या निवांत जरी असला तरी पक्षातील ही शांतता वादळापूर्वीची शांतता आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा त्सुनामी येण्याची शक्यता आहे.

