वसंत भोईर,वाडा
भिवंडी – वाडा रस्त्याचे काम ठेकेदार कंपनीने थांबवले,
भिवंडी – वाडा रस्त्याचे काम गेल्या चार पाच दिवसांपासून बंद असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत,निधी मिळाला नसल्याने हे काम बंद असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.शासन व ठेकेदार कंपनीमुळे प्रवासी व सामान्य नागरिक मात्र भरडला जात आहे.या प्रकारामुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
भिवंडी वाडा मनोर या रस्त्याच्या सिमेंट क्राॅकीटीकरणाचे काम ईगल या ठेकेदार कंपनीला मिळाले असून यासाठी ८०२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.कंपनीने हे काम सुरू केले असून तानसा पुल ते कुडूस या दरम्यानचे काम काही टप्पे वगळता पुर्ण झाले आहे.तर शिरीष पाडा ते वाडा खंडेश्वरी नाकापर्यंत काम काही टप्पे वगळता एका बाजुचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे.सध्या एका बाजुला संपूर्ण खोदकाम करण्यात आले आहे.त्यामुळे रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले असून यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.याचा त्रास वाहनचालकांसह नागरिकांना होत आहे.नागरिकांना होणा-या त्रासाची दखल घेऊन श्रमजीवी संघटनेने काही दिवसांपूर्वी भिवंडी – वाडा महामार्गावर एकाच वेळी अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन छेडून प्रशासनाला जाब विचारला होता.त्याची दखल घेत प्रशासनाने रस्ता सुस्थितीत करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते.या आंदोलनानंतर काही दिवस रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता सुस्थितीत करुन देण्यात आला होता.मात्र आता तो पुन्हा खड्ड्यात गेला असून त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
आता शासनाकडून पैसे मिळाले नाहीत म्हणून गेल्या चार पाच दिवसांपासून काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालक प्रवाशांसह नागरिकांचे हाल होत आहेत.
शासनाकडून पैसे न मिळाल्यामुळे गेल्या चार पाच दिवसांपासून काम बंद करण्यात आले आहे.त्यामुळे या कंपनीकडून काम काढून घेऊन निविदेतील दुस-या ठेकेदार कंपनीला हे काम देण्यात यावे.जर काम करण्याची ठेकेदार कंपनीची कुवत नसेल तर प्रशासनाने हा निर्णय घ्यावा,
प्रफुल्ल पाटील
जिल्हाध्यक्ष
काॅंग्रेस पालघर जिल्हा
बांधकाम विभागाकडे आत्तापर्यंतच्या झालेल्या कामाचे बील पाठवण्यात आले असून प्रशासनातील कोणीही यावर बोलायला तयार नाही.आत्तापर्यंत ठेकेदार कंपनीला एक रू.ही मिळालेला नाही तसेच गेल्या वेळी झालेल्या आंदोलनामुळे कंपनीने दीड कोटी रूपये खर्च करून खड्डे बुजवले.त्याचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत,आता मशिनरी मध्ये टाकायला डिझेल नाही त्यामुळे आम्ही हे काम बंद ठेवले आहे,
दिनेश सिंग
व्यवस्थापक
ईगल कंपनी,

