दीपक मोहिते,
वसई पूर्वेस रेंज ऑफिस येथे होणारी वाहतूककोंडी नाहीशी होणार ; आ. तरे यांचे प्रयत्न फळाला आले…
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत बोईसरचे आ.विलास तरे यांनी वसई पूर्वेस रेंज नाका येथे होणाऱ्या वाहतूककोंडीबाबत प्रश्न उपस्थित करत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी आ.तरे यांनी सुचवलेल्या पर्यायावर विचार करून उपाययोजना करू,असे आश्वासन दिले.त्यामुळे या परिसरातील नागरिक तसेच रोजगारानिमित्त येथी औद्योगिक क्षेत्रात दररोज येजा करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.गेली अनेक प्रलंबित असलेला हा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार असल्यामुळे येथील आठ ते दहा गावातील नागरिक आ.विलास तरे यांना धन्यवाद देत आहेत.

वसई पूर्वेस असलेल्या वालीव,सातीवली व गवराईपाडा,या भागात मोठ्याप्रमाणात नागरीकरण झाले तसेच येथील औद्योगिक कारखान्याच्या संख्येत झालेली वाढ व रोजगारासाठी दिवसाकाठी येजा करणाऱ्या हजारो कामगारामुळे रेंज नाका येथे मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होत असते.येथे तीन रस्ते एकत्र येत असल्यामुळे वाहनांच्या सतत रांगा लागत असतात.त्यामुळे रेंज ऑफिस येथे रस्त्यालगत असलेले वनविभागाची चौकी दूर करावी,जेणेकरून वाहतूक कोंडी नाहीशी होईल, ही चौकी बाजूला सरकवण्यात यावी,अशी मागणी करण्यात येत होती.पण या मागणीला सतत केराची टोपली दाखवण्यात येत होती.अखेर आ.विलास तरे यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी केली व नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा ज्वलंत प्रश्न उपस्थित केला.त्यास पालकमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत,लवकरात लवकर जागेची पाहणी करून कार्यवाही करू,असे स्पष्ट आश्वासन दिले.आ.तरे व पालकमंत्री नाईक,या दोघांच्या प्रयत्नातून हा ज्वलंत प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे हजारो नागरिक व नोकरदार मंडळींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

