वसंत भोईर,वाडा
बामण शेत गावात सोयी -सुविधांचा पत्ताच नाही,
तालुक्यातील अनेक गाव पाड्यात स्वातंत्र्यानंतरही नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.नांदणी अंबरभुई ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बामण शेत गावातील आदिवासी बांधवांना गावात जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे त्यांना चिखल तुडवत पायवाटेने जावे लागते. पाण्याची समस्या,वीज आहे, परंतु असून नसल्यासारखी. त्यामुळे आम्ही आदिवासींच्या पोटी जन्म घेतला आणि तोही दुर्गम भागात घेतला हा आमचा गुन्हा झाला काय ? असा संतप्त सवाल या गावातील आदिवासींकडून सरकारला विचारण्यात येत आहे.
बामण शेत हे गाव घनदाट जंगलात डोंगर माथ्यावर आहे. साधारणपणे ३५ ते ४० घरांची लोकवस्ती असून या गावची लोकसंख्या २०० च्या आसपास आहे. निवडणूकीच्या काळात लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते जंगलवाट तुडवत पायवाटेने मतांचा जोगवा मागण्यासाठी येथे येत असतात.त्यानंतर मात्र येथे ढुंकूनही पाहत नसल्याची खंत येथील आदिवासी व्यक्त करत आहेत.महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी या गावात तातडीने रस्ता करण्यात यावा,असे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिले होते. परंतु त्यालाही प्रशासनाने केराची टोपली दाखवली.या गावातील आदिवासी बांधवांनी प्रशासनाकडे अनेकदा हेलपाटे मारले,पण काही त्यांच्या पदरी निराशाच पडली.त्यामुळे सध्या तरी या गावात जायला रस्ता नसल्यामुळे येथील आदिवासी नागरिकांना चिखल तुडवत पायवाटेने जावे लागत आहे. येथील आदिवासी कुटुंबे मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत.शिक्षण व रोजगाराची सुविधा नसल्याने ग्रामस्थाना पाच कि.मी.रोजची पायपीट करावी लागते.त्यामुळे रोजगारासाठी त्याना शहराकडे स्थलांतर करावे लागत आहे.
या गावाच्या परिसरात घनदाट जंगल असल्यामुळे सर्पदंश होण्याचे प्रमाण जास्त आहे.शिवाय आजारी रुग्ण, वृद्ध व गर्भवती महिला यांना डोली करूनच पाच कि.मी. अंतरापर्यंत न्यावे लागते. येथील आदिवासींना पावसाळा सुरू होण्या आधी तीन महिने पुरेल इतका अन्न धान्य साठवून ठेवावा लागतो. पावसाला सुरुवात झाली की त्यांचे जाणे येणे होत नाही . पावसाळ्यात रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असते. विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्या शैला घाटाळ यांनी दिली. स्वातंत्र्यानंतरही या गावातील आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्यानमुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही येथे राहत असून, अनेक गैरसोईचा सामना आम्हाला करावा लागतो. मायबाप सरकारने आमच्याकडे आता तरी लक्ष द्यावे.
– सागर गिरा,ग्रामपंचायत सदस्य

