दीपक मोहिते,
वसई तालुक्याच्या स्वयं पुनर्विकासाला सुरुवात, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,
स्वयंपुनर्विकास हे जनआंदोलन म्हणून पुढे आले आहे.ठाणे,पनवेल,घणसोली येथे या योजनेची शिबीरे, सभा,बैठका झाल्या. शिवधनुष्य पेलवणे फार अवघड असते,पण स्वयंपुनर्विकासाचे हे शिवधनुष्य आम्ही उचलले आहे आणि ते पेलवणार आहोत,असा विश्वास भाजपचे गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी वसई येथे झालेल्या शिबिरात व्यक्त केला.
वसई येथे भाजपा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकाराने स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी नालासोपाऱ्याचे आ.राजन नाईक,वसई विरार शहर महानगरपालिका नगर रचना विभाग प्रभाग उपसंचालक शेखर दिघावकर,प्रांत अधिकारी शेखर घाडगे, सहकारी संस्था पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी, सहकारी संस्था उपनिबंधक वसई अमर शिंदे,ठाणे हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे,ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी शरद काशिवले, ईश्वर धुळे,भाजपा वसई-विरार जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील, अभ्यासक हर्षद मोरे यांच्यासह वसई तालुक्यातील नागरिक,सर्व मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले,मुंबईत असलेला स्वयंपुनर्विकास वसईत झाला पाहिजे,ही भावना घेऊन स्नेहा दुबे-पंडित काम करत आहेत.स्वयं पुनर्विकास म्हणजे मोठी टेक्नॉलॉजी नाही. विकासकाशिवाय आपली इमारत विकसित करायची. विकासक पैसे लावतो आणि परवानग्या मिळवून देतो, यासाठी आपण त्याच्याकडे जातो.मी मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे.मुंबई बँकेच्या गृहनिर्माण संस्था सदस्य आहेत.या सोसायट्यांना अर्थपूरवठा करते व सरकारने पाठबळ दिले तर कशाला विकासक हवा, हा विचार करून मुंबई बँकेने स्वयंपुनर्विकास कर्ज धोरण आणले.सरकारचे पाठबळ मिळणार नसेल तर या योजनेला गती मिळणार नाही, हे लक्षात आले.त्यासाठी गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या परिषदेत १८ मागण्या शासनाकडे सादर केल्या.त्याविषयी १६ शासन निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ काढले.त्यानंतर स्वयंपुनर्विकासाला हळूहळू गती मिळाली.आज मुंबई बँकेच्या पुढाकाराने २० इमारती उभ्या राहिल्या असून लोकं आपल्या प्रशस्त घरांत राहायला गेली आहेत,याकडे दरेकर यांनी लक्ष वेधले.
ते पुढे म्हणाले,कांदिवली येथील वेतांबरा इमारतीच्या चावीवाटप कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस स्वतः आले होते.या कार्यक्रमात त्यांनी स्वयंपुनर्विकासाला गती मिळण्यासाठी आणखी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, ही केवळ मुंबईची गरज नसून राज्यातील सर्व शहरांची गरज झाली आहे,म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली दरेकर समिती घोषित केली.ही समिती घेऊन मी महाराष्ट्रभर दौरा करून जो अहवाल तीन महिन्यांत सादर करायचा होता तो अडीच महिन्यांतच सरकार दरबारी सादर केला.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी झोपडपट्टीतील नागरिकांसाठी अफजलपूरकर समितीच्या माध्यमातून एस.आर.ए.ची निर्मिती केली.तसाच माझ्या समितीच्या माध्यमातून राज्यात स्वयंपुनर्विकास ताकदीने होईल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरेकर अभ्यास गटाच्या पालघर जिल्ह्याची जबाबदारी सरकारी समन्वय यंत्रणा म्हणून त्याच्या प्रमुखपदी वसईच्या संघर्षकन्या आ. स्नेहा दुबे-पंडित यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार करत असल्याची घोषणा दरेकर यांनी या कार्यक्रमात केली. महापालिकेशी समन्वय साधणे,गृहनिर्माण संस्थांना मार्गदर्शन करणे,जिल्हा बँकेकडून पाठपुरवठा करणे व जी मदत लागेल ती दुर्वेच्या नेतृत्वाखाली होईल. जेणेकरून हा विषय मुंबईत जसा पुढे जातोय तसाच तो पालघर जिल्ह्यात पुढे जावा. वसईकरांच्या ज्या अपेक्षा आहेत,त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू,जनतेला स्वयं पुनर्विकास विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपापल्या कार्यालयात कक्ष स्थापन करा,असे आवाहनही दरेकर यांनी केले.
दरेकर म्हणाले की,मुंबई बँकेला मर्यादा आहेत.१६०० प्रस्ताव आमच्याकडे आले आहेत.मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे सहकारी बँकेकडून दीड हजार कोटी, एनसीडीसीकडून एक हजार कोटी स्वयंपुनर्विकास योजनेसाठी मिळणार आहेत. राज्यात सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन स्थापन करण्याची विनंतीही आपण राज्य सरकारला केली आहे. त्याला तत्त्वतः मान्यताही मिळाली आहे.त्यामुळे स्वयं पुनर्विकासाचे काम आता गतीने होईल.सरकार, मुख्यमंत्री फडणवीस पाठीशी आहेत.स्वयंपुनर्विकास योजनेतून पाच इमारती वसईत उभ्या करा,तेव्हा लोकांचा या योजनेवर विश्वास बसेल.या पाच इमारतींचे भूमिपूजन महिनाभरात करा. इमारत उभी राहिली की चावीवाटपासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना घेऊन येऊ, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी व्यक्त केला.

