वसंत भोईर,वाडा
वाड्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाला सुरुवात,
राज्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग दरवर्षी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण अभियान राबवत असते.या शैक्षणिक वर्षांत देखील राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे ५ ते २० जुलै २०२५ दरम्यान हे सर्वेक्षण राबवण्यात येत आहे. त्यासाठी राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सर्व जिल्हा व तालुका शिक्षण अधिकाऱ्यांना आवश्यक ती तयारी करून सर्वेक्षण प्रभावीपणे राबवण्याचे आदेश दिले आहेत.
या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश शाळाबाह्य आणि स्थलांतरित कामगारांच्या बालकांचा शोध घेणे आणि त्यांना पुन्हा शाळेच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणे,असा आहे.अनेक वेळा विविध सामाजिक,आर्थिक व स्थलांतराच्या कारणांमुळे लहान मुले शिक्षणापासून वंचित राहतात.या मुलांना शोधून त्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवणे,हे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या राज्यव्यापी उपक्रमाची सुरुवात पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात चिंचघर जिल्हा परिषद शाळेने केली आहे.शाळेचे शिक्षक गावोगाव जाऊन पालकांशी संवाद साधत असून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आहेत. शाळाबाह्य मुलांच्या नावांची नोंद करण्यात येत आहे.शिक्षक,मुलांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आहेत.विशेष करून स्थानिक कामगार , वीटभट्टी कामगार,शेतमजूर व हमालांच्या कुटुंबातील मुले शाळाबाह्य असतात. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,स्थानिक स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य घेण्यात येत आहे.मुलांची माहिती गोळा करून त्यांना जवळच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.राज्यातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क मिळावा,यासाठी शिक्षण विभागाचे हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.

