जव्हार प्रतिनिधी,
जव्हार अर्बन बँकेकडून ग्राहकांसाठी महत्वाचा निर्णय,
ग्रामीण भागातील जनतेचा आधार म्हणून ओळखली जाणारी आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणारी दि जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.जव्हारने आपल्या ग्राहकांसाठी दिलासादायक पाऊल उचलले आहे.संचालक मंडळाने व्यावसायिक, शेतकरी,तरुण उद्योजक आणि लघुउद्योजकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी कर्ज व्यवहारात मोठा बदल जाहीर केला आहे.
ग्राहकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन बँकेने कर्जाचे व्याजदर कमी केले असून, विविध कर्ज योजनांची मर्यादा वाढवून अधिक रकमेचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.
यासोबतच त्वरित कर्ज मंजुरीसाठी सोपी प्रक्रिया आणि परवडणारे व्याजदर यामुळे ग्राहकांसाठी नवी दालने खुली झाली आहेत, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद बाबुराव मुकणे यांनी दिली.
घर बांधणी,व्यवसाय विस्तार, सोने तारण,शिक्षण,शेती विकास,नवीन वाहन खरेदी किंवा सणासुदीच्या खरेदीसाठी आता जव्हार अर्बन बँकेकडून मिळणारे कमी व्याजदरातील वाढीव कर्ज सर्वांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.पूर्वीपेक्षा अधिक कर्जरक्कम उपलब्ध झाल्याने मोठ्या योजना,भांडवली गुंतवणूक आणि आर्थिक प्रगतीचा नवा मार्ग ग्राहकांसाठी खुला झाला आहे.
बँकेचे चेअरमन निलेश जनार्दन पाटील यांनी सांगितले की,जव्हार अर्बन बँक नेहमीच ग्राहकांच्या प्रगती आणि उत्कृष्ट सेवेसाठी कटिबद्ध आहे.कमी व्याजदर,वाढीव कर्जमर्यादा आणि जलद मंजुरी यामुळे आमच्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.ग्राहकांचा विश्वास आणि विकास हीच आमची खरी संपत्ती आहे.” बँकेच्या सभासदांना अनेक वर्षांपासून लाभांश ( डिव्हिडंड ) मिळालेला नाही.परंतु नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार व प्रभावी व्यवस्थापनामुळे बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा घडवून आणली आहे.
त्यामुळेच यावर्षी सभासदांना डिव्हिडंड देणे शक्य झाले असून संचालक मंडळाने त्याबाबत निर्णय घेतला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन यांनी दिली.उज्वल परंपरा, पारदर्शक व्यवहार,ग्राहककेंद्रीत धोरणे आणि राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांमुळे जव्हार अर्बन बँक आज पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य सहकारी बँक ठरली आहे.
स्थानिक लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकेने घेतलेला हा निर्णय नव्या विकासाच्या संधी निर्माण करणारा ठरेल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.ग्राहकांनी या वाढीव कर्ज सुविधांचा लाभ घ्यावा,असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले असून,अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेशी आजच संपर्क साधावा,असे कळवले आहे.

