वसंत भोईर,वाडा
नाल्यातील बांधकामामुळे भातशेतीचे नुकसान,
वाडा तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील कोका-कोला कंपनी शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.येथे असलेल्या नैसर्गिक नाल्यात या कंपनीने संरक्षक भिंत बांधल्यामुळे नाल्याचे संपूर्ण पाणी भातशेतीत जात असून भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात प्रशासनाने या कंपनीवर कारवाईचा बडगा उभारून शेतकऱ्यांना न्याय द्यावा,अशी मागणी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
नैसर्गिक नाल्यांमध्येच बांधकाम केल्यामुळे हे संपूर्ण पाणी भातशेतीत जाऊन शेतीची नासाडी झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडणार आहेत.या कुटुंबीयांचा उदरनिर्वांचा प्रश्न निर्माण झाला आहे.या नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलला आहे.नालाच अरुंद केल्याने नाल्याच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही. त्यामुळे पूर्णपणे शेत जमिनीची नासाडी झाली आहे.प्रशासनाने सदर बाब गांभीर्याने घेऊन कंपनीने केलेले हे बांधकाम तोडून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसा नीचे पंचनामे करा व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या व नाल्यातील बांधकाम तोडावे,अशी मागणी केली आहे.

