सुरेश काटे,तलासरी
तलासरी तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्रांना टाळे,
पालघर जिल्ह्यात युरिया खत आणि भात बियाण्यांच्या अनियमित आणि अन्यायकारक विक्री विरोधात शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता,
तलासरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्याही तक्रारी करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत जिल्हा कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांवर करडी नजर ठेवली व शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या तलासरी तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्रांवर थेट कारवाई करत त्यांचे परवाने रद्द केले आहेत.
तलासरी तालुक्यातील त्रिशा कृषी सेवा केंद्र आणि योगिता कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. या विक्रेत्यांकडून युरिया खतासाठी सरकारने निश्चित केलेल्या २६६ रु.पेक्षा अधिक म्हणजेच ३०० ते ३३० पर्यंतच दर आकारलण्यात येत होते. याव्यतिरिक्त, ” बियाणे घेतल्याशिवाय खत मिळणार नाही,” अशा अटी लादून शेतकऱ्यांवर दबाव टाकण्यात येत होता.त्यामुळे आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ शेतकऱ्यांवर अन्याय होऊन पारंपरिक बियाण्यांचा वापरही कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.
या गंभीर प्रकाराची दखल घेत,जिल्हा कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. गेल्या ४ जुलै रोजी प्राथमिक तपासणी करण्यात आली होती.त्यानंतर १० जुलै रोजी अधिकृत आदेश काढून योगिता आणि त्रिशा कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर कृषी सेवा केंद्रांवर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.अनेक शेतकऱ्यांनी अशाच प्रकारच्या तक्रारी अन्य दुकानदारांविरोधातही केल्या आहेत.त्यामुळे ही कारवाई केवळ सुरुवात असून,दोषी विक्रेत्यांवर कारवाई होईपर्यंत शेतकऱ्यांची लढाई सुरू राहणार असल्याचे इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.
कारवाईसंदर्भातील आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की,खत विक्री करताना शासननिर्धारित दरापेक्षा अधिक रक्कम आकारणे, बियाणे खरेदीवर बंधने घालणे तसेच कृषी सेवा केंद्र नियमावली व खत नियंत्रण आदेश १९८५ च्या विविध कलमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई आवश्यक ठरली. ही कारवाई शेतकरी आणि सार्वजनिक हिताचे रक्षण करण्यासाठी अत्यावश्यक असल्याचेही आदेशात नमूद आहे.तरीही अनेक कृषी सेवा केंद्रांकडून चढ्या भावाने खतांची विक्री केली जात असून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.अशा दुकानदारांवर कृषी विभागाकडून कठोर कारवाई करण्याची गरज आहे,अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ कृषी कार्यालयात तक्रार करावी. सध्या कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी सुरू आहे. चौकशीत इतर दुकानदार दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल,असे तलासरी कृषी कार्यालयाकडून स्पस्ट करण्यात आले असले तरी एवढे दिवस कृषी केंद्राकडून शेतकऱ्याची लूट सुरु असताना कृषी कार्यालयाकडून का कारवाई झाली नाही,असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.

