वसंत भोईर,वाडा
डाळिंबाला सोन्याचा भाव, मागणीमध्ये मात्र घट नाही…
डाळिंब शेती फायदेशीर व्यवसाय असून त्यातून नफा मिळवण्यासाठी योग्य नियोजन, व्यवस्थापन आणि परिश्रमाची आवश्यकता असते.पालघर जिल्ह्यात डाळिंबाचे उत्पन्न नाहीच्या बरोबर आहे.आयात झालेल्या फळांच्या बळावरच आपली मदार असते.त्यातही यंदा पावसामुळे डाळिंबाचे क्षेत्र कमी झाले आहे.त्यामुळे यंदा डाळिंबाच्या दाण्यांना मोत्याचा भाव आला आहे.
डाळिंब हे खडकाल व माळ रानावर येणारे पीक आहे. इतर पिकांप्रमाणे या पिकाला जास्त प्रमाणात पाणी लागत नाही.कमी पाण्याचे हे पीक असले तरी अतिवृष्टीत या पिकाची प्रचंड मोठ्या प्रमाणावर नासाडी झाल्यामुळे यंदा भाव वाढले आहेत.
डाळिंबाची मागणी सर्वत्र प्रचंड असते.वाड्याच्या बाजारपेठेतही ग्राहक डाळिंबाला मोठ्याप्रमाणावर पसंती देत असतात.शहरातील बाजारपेठेत १५० ते २०० रु. किलो दराने सध्या विक्री सुरू आहे.
शेतकऱ्यांकडून येणारा माल दलाल अत्यल्प दरात खरेदी करतात.त्यानंतर फ्रुट मंडीत त्याची चढ्या दराने विक्री केली जाते.परिणामी शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडते.
डाळिंबाची शेती करताना ती कमी खर्चात होत असली तरी त्यावरील फवारण्या आणि देखभालीचा खर्च मोठा असतो.
त्यामुळे शेतकरीवर्ग जेरीस येतो.परंतु यंदा डाळिंबाला बाजारात समाधानकारक भाव मिळत आहे.
यंदा डाळिंबावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे,त्यामुळे त्याचा पिकावर चांगलाच परिणाम झाला आहे.
वाशी व कल्याण मार्केट मधून डाळिंबे येतात.सध्या त्याची आवक मोठ्याप्रमाणात वाढली आहे.गेल्या वर्षाच्या तुलनेत डाळिंबाच्या किंमतीत यंदा चांगलीच वाढ झाली आहे.तरीही ग्राहकांची चांगली मागणी आहे.
– शैलेश चौधरी, फळविक्रेता

