वसंत भोईर,
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे आमचे ध्येय
_सुनीता अग्रवाल
वाडा तालुक्याच्या ग्रामीण भागातील शिक्षणाच्या समस्या जाणून सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही शाळांना फक्त भौतिक सुविधा देत नसून या तालुक्यातील दुर्गम, आदिवासी भागात तळागाळातल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी होईल यासाठी सेवा सहयोग फाउंडेशनच्या जोडीने आम्ही विविध स्तरांवर काम करीत असल्याचे मोतीलाल ओसवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनीता अग्रवाल यांनी सांगितले.
मोतीलाल ओसवाल फाउंडेशन व सेवा सहयोग फाउंडेशन,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचघर येथील ह.वी. पाटील विद्यालय व कै.घ.बा. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचची नवीन इमारत,नूतनीकरण व स्वच्छतागृह यांचा लोकार्पण सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास सेवा सहयोग फाउंडेशनचे प्रमुख किशोर मोघे,दिपाली देवळे,महर्षी वैष्णव,राम रोकडे,अश्विनी पवार,संदीप पवार तसेच संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाटील,सचिव श्रीकांत भोईर,सदस्य गणेश पाटील,तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्याध्यापक संदेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकेत शाळा स्थापनेचा ६२ वर्षांच्या इतिहासाचा मागोवा घेतला.या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळालेल्या सेवा सुविधांमुळे शिक्षकांना व मुलांना एक नवीन ऊर्जा मिळाल्याचे सांगितले.तर सेवा सहयोगचे प्रमुख किशोर मोघे यांनी आपल्या मनोगतात, समाजातील अज्ञानाचा अंधार दूर होऊन गरीब वंचितांचे जीवन प्रकाशमान व्हावे,हा आमच्या कार्याचा मूळ उद्देश असल्याचे सांगितले. कुडूस विभाग शिक्षण सेवा संघ संस्थेतर्फे सचिव श्रीकांत भोईर यांनी या स्वयंसेवी संस्थांच्या समर्पित भावनेने केलेल्या सहकार्यामुळे शाळांचा सर्वर्थांनी कायापालट होत आहे.त्यांच्या या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.तसेच या कार्यक्रमानंतर दोन्ही फाउंडेशनच्या प्रमुखांनी तालुक्यातून आलेल्या सर्व मुख्याध्यापकांकडून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि सविस्तर चर्चा केली.

