वसंत भोईर,वाडा
यांत्रिकी पद्धतीने भातलागवडीकडे वाढला कल.
वाडा तालुक्यात जुलैच्या दुस-या आठवड्यापासून सर्वत्र भातलावणीच्या कामाला जोमाने सुरुवात करण्यात आली असून मजुरांच्या कमतरतेमुळे यावेळेस तालुक्यातील शेतकऱ्यांचा यांत्रिकी भात लागवडीकडे कल जास्त असल्याचा दिसत आहे.यात मेहनत,वेळ व खर्चाची मोठी बचत होत आहे.
वाड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सर्व तालुक्यांतील गाव-पाड्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे.मात्र एकाचवेळी सर्व तालुक्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरुवात झाल्यानमुळे वाडा तालुक्यात मजुरांची मोठी कमतरता नेहमीच भासत असते.त्यामुळे विक्रमगड,तलासरी,जव्हार, मोखाडा व नाशिक या ठिकाणांहून मजूर आणावे लागतात.त्यात मजुरांचे दरही वाढले आहेत.एका शेतमजुराला दररोज ४५० ते ५०० रू.अधिक सकाळी न्याहरी,दुपारी जेवणही द्यावे लागते.त्यामुळे शेती हा जास्त कष्टाचा आणि खर्चिक व्यवसाय होऊ लागला आहे.
भातशेतीसाठी पावसाळ्यात मिळणारे मजूर गेल्या अनेक वर्षांपासून मिळत नसल्याने भातपीकाची लागवड करायची कशी,असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडतो.याचा विचार करून यांत्रिकी शेतीची संकल्पना शेतकऱ्यांमध्ये वाढीस लागली आहे.यंत्राच्या सहाय्याने भात लागवड ही पद्धत आता फायदेशीर ठरू लागली आहे.यंत्राच्या साहाय्याने एक एकर जमिनीत भात लागवड करण्यासाठी केवल दोन तास लागतात.भात लागवडीसाठी एकरी ८ हजार रु.तर कापणी व झोडणीसाठी प्रत्येकी २ हजार असा एकूण १२ हजार रु.एकरी खर्च येत असतो. खर्च,मेहनत व वेळेची बचत होत असल्यामुळे यांत्रिकी पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आता वाढला आहे.यांत्रिकी पद्धतीने भातलागवड,भातकापणी व झोडणी केल्यास मेहनत,वेळ व खर्चाची मोठी बचत होत असल्याचे चांबळे येथील शेतकरी नरेश पाटील यांनी सांगितले.
तालुक्यात १७६ गावे, २०९ हून अधिक पाडे असून १५ हजार हेक्टर क्षेत्र भातपीकाखाली आहे.येथील शेती,ही पावसावर अवलंबून आहे.येथे झिनी ( वाडा कोलम ), सुरती,सुवर्णा, जोरदार,वाय.एस.आर.मसुरी, एककाडी,गुजरात ११, गुजरात १३,वाडा झिनिया, रत्नागिरी-७,रत्नागिरी-८, रत्ना,जया,कर्जत सुवर्णा, मसूरी,समृद्धी,राशीपुनम,शतक,सुंदर आदी भातांच्या वाणांची लागवड करून उत्पन्न घेण्यात येत आहे.

