वसंत भोईर वाडा,
शेतकऱ्यांचे खासदारांना साकडे,
तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील टायर रिसायकलिंग कंपन्या चिंचघरपाडा, मुसारणे( पाटील पाडा ) या गावातील परंपरागत वहिवाटीच्या नैसर्गिक नाल्यात टायर कंपनी मालकाने संरक्षक भिंत बांधली आहे.त्यामुळे नाल्याचे संपूर्ण पाणी नजीकच्या भातशेतीत गेल्यामुळे पेरणी केलेले संपूर्ण पीक वाया गेले आहे .
या संदर्भात निवेदन देऊनही कार्यवाहीसाठी चालढकल होत होती.अखेर येथील शेतकऱ्यांनी पालघरचे खा.डॉ. हेमंत सावरा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले.
परंपरागत चालत आलेला नैसर्गिक नाला बंद केल्यामुळे या दोन गावातील शेतकऱ्यांचे २५ ते ३० हेक्टर क्षेत्र बाधित होऊन येथील संपूर्ण भात शेती नापीक होणार असल्याचे खा. डाॅ.हेमंत सवरा यांच्या निदर्शनास आणले. त्यांनी दूरध्वनीद्वारे वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याशी संपर्क साधून या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर जाऊन ती संरक्षक भिंत हटवण्याचे निर्देश दिले.त्यानंतर महसूल यंत्रणा खडबडून जागी होऊन सदर जागेवर जाऊन पाहणी केली व कंपनी मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या.उद्या शेतकरी आणि कंपनी मालक यांची तहसीलदार कार्यालयात सुनावणी लावून कार्यवाही करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.गेल्या महिन्यापासून कार्यवाहीसाठी शेतकरी प्रयत्न करीत होते. मात्र प्रशासनाकडून चाल ढकल होत होती. मात्र खा.डॉ. हेमंत सवरा यांची भेट घेताच महसूल यंत्रणा कामाला लागली आहे.
नाल्यात उभारलेली संरक्षक भिंत तत्काळ तोडून नाला पूर्ववत करून शेतकऱ्यांच्या भात शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.
– दशरथ पाटील, शेतकरी चिंचघर पाडा,

